जमिनीत जिरवू पाणी पावसाचे
पाण्याच्या उपलब्धतेवरच
आहे पृथ्वीचे अस्तित्व
पाण्याचे आपण जाणून आहोत महत्व !
अशा प्रकारच्या घोषणा देत धनगरवाडी येथे ओढा खोलीकरण अंतर्गत केलेल्या ओढ्यातील पाण्याचे सोमवारी जागतिक जल दिनानिमित्त महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी पाण्याचे महत्व पटवून देऊन पाणी वाचविण्याची शपथ देखील घेण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १४ व्या वित्त आयोगातून धनगरवाडी गावातील लिंबाजीचा ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले. सध्या हा ओढा पाण्याने भरला असून जागतिक जल दिनानिमित्त या ओढ्यातील पाण्याचे जलपूजन गावातील महिलांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच महेश शेळके, उपसरपंच राजेंद्र शेळके, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका शेळके, नयना कराळे, निर्मला घोगरे, सोनल पवार, योगिता शेळके, राणी जाधव, शिवगर्जना युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग शेळके व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सरपंच महेश शेळके म्हणाले, मानवी कृत्यांमुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील पाणी वाहून रस्त्यावर वाहून जाते,यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो.आपण आपल्या शेतांमध्ये पाणी भरताना पाणी किंचितही वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पुढील पिढीसाठी पाण्याचे नियोजन आतापासूनच करायला हवे.
२२ खोडद जलपूजन
ओढा खोलीकरण कामातील पाण्याचे पूजन करताना महिला.