- नम्रता फडणीस
पुणे : इंग्रजांच्या भारतीय राजवटीत ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल रेजिनल्ड डायर याने १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथील जालियनवाला बाग याठिकाणी भीषण हत्याकांड घडवून आणले. भारताच्या इतिहासातील हा अत्यंत काळा दिवस. उद्या (दि. १३) या घटनेला १०४ वर्षे पूर्ण होत आहेत. लेखक मनोहर सोनावणे यांनी या घटनेचा परामर्श घेणारे ‘जालियनवाला बाग १३ एप्रिल १९१९’ हे पुस्तक लिहिले आहे. लवकरच विश्वकर्मा पब्लिकेशनच्यावतीने हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्यानिमित्त मनोहर सोनावणे यांच्याशी संवाद साधला असता ‘जालियनवाला बाग हत्याकांड' म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा ट्रिगर पॉईंट असल्याचे त्यांनी सांगितले.
१. आज या घटनेला शंभर वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी बरेचसे लेखनही झाले आहे. तरी हाच विषय का निवडावासा वाटला?
- जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी मराठीमध्ये सविस्तर माहिती देणारे आणि विश्लेषण करणारे पुस्तक आलेले नाही. दोन ते तीन पुस्तकात संदर्भ म्हणून या घटनेचा केवळ उल्लेख झाला आहे. उद्धमसिंगवर कादंबरीवजा लेखन झाले आहे. पण समग्र लेखन झालेले नाही.
२. या पुस्तकात वेगळे काय वाचायला मिळेल?
- जालियनवाला बाग हत्याकांड ही भारतीय इतिहासामधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. याचं कारण असं आहे की, १९२३ पर्यंत जी स्वातंत्र्य चळवळ होती, त्यावेळच्या नवशिक्षित वर्गाला इंग्रजी शिक्षणामुळे नवीन जगाचे भान आले होते. त्यांना स्वातंत्र्य, समता अधिकार याची एक समज तयार झाली होती. ब्रिटिश कारभार पद्धतीची एक जाणीव झाली होती. आमचे राज्य आम्ही करू, अशी भावना शिक्षित वर्गात निर्माण झाली होती. एका नेमस्त आणि सनदशीर मार्गाने ही चळवळ सुरू झाली होती. मात्र अशिक्षित वर्ग या चळवळीमध्ये नव्हता. हा वर्ग चळवळीत यायला जालियनावाला बाग हत्याकांड ही घटना कारणीभूत ठरली. इतिहासाच्या पुस्तकात ही घटना मिळते पण ती एका पानापुरती आहे. डायरचे पुढे काय झाले? काय घडामोडी घडल्या? ब्रिटन आणि भारतात त्याचे काय पडसाद उमटले, हा पट मांडणारे हे पुस्तक आहे.
३. या हत्याकांडामागची पार्श्वभूमी काय?
- रौलट कायदा हा भारतातील ब्रिटिश सरकारने पारित केला. त्यानुसार कुणालाही सक्तीने विनाचौकशी तुरुंगात डांबणे विशेषत: क्रांतिकारकांना पायबंद करणे हा विचार होता. या कायद्याला विरोध करण्यासाठी गांधीजींचे नेतृत्व उभे राहिले. त्यातून त्यांनी सत्याग्रहाची संकल्पना मांडली. या सर्वांचे पहिलेपण हे जालियनावाला बाग हत्याकांडाकडे जाते. या सत्याग्रह चळवळीकडे पंजाबमधील गव्हर्नरने उठावाच्या दृष्टिकोनातून पाहिले आणि त्यांनी कठोर पावले उचलली.
४. प्रत्यक्षात ही घटना कशी घडली?
- ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी अमृतसरच्या जालियनवाला बागेत एक सभा ठेवण्यात आली. ज्या दिवशी सभा होती त्याच्या आदल्या दिवशी सैफुद्दीन खिशलू आणि सत्यपाल सिंग यांना हद्दपार करण्यात आले होते. त्यांचे काय झाले हे विचारण्यासाठी जमाव जमला. त्या जमावावर गोळीबार झाला. मोठी दंगल उसळली. जमावाने तीन बँका जाळल्या. त्यानंतर शहर लष्कराच्या हातात सोपवले. जनरल डायर याच्या हुकूमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या फैरी झाडल्या. पण हे करण्याआधी डायरने लोकांना इशारा दिला नव्हता. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. यात ७०० ते ८०० लोक मारले गेले. या घटनेमुळे स्वातंत्र्य चळवळीला बळकटी मिळाली. जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा ट्रिगर पॉईंट होता. ब्रिटिशांच्या शेवटाची सुरुवात जालियनवाला बाग हत्याकांडापासून झाली.
५. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय राष्ट्रवाद आणि आत्ताच्या काळातला लोकांच्या मनात बिंबवला जाणारा राष्ट्रवाद त्याची तुलना कशी करता येईल?
- आज जे काही चालले आहे, त्यात हिंदू-मुस्लिमांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या काळातला लढा हिंदू-मुस्लिम आणि शीख यांनी एकत्रित येऊन लढला होता. हिंदू-मुसलमान की जय ही घोषणा होती. हा हिंदू-मुसलमान एकीचा विषय होता. उद्धमसिंगने ओडवायरला मारले तेव्हा त्याने त्याचं नाव हे मोहम्मद सिंग आझाद असे सांगितले. तो एकीचा राष्ट्रवाद होता. आपण सर्व भारतीय आहोत ही भावना होती. आजच्या राष्ट्रवादाशी तो अजिबात सुसंगत नाही.
६. सध्या सोशल मीडियावर इतिहासाची मोडतोड करून, आपण सांगू तेच खरं, अशी प्रवृत्ती बळावत चालली आहे, खरा आणि खोटा इतिहास असं काही असते का?
- आपण प्रामुख्याने लढ्यांचा इतिहास बघतो. सामान्यांचा इतिहास बघतच नाही. आज जो इतिहास मला गौरवास्पद वाटतो तो विरोधकांना अपमानास्पद वाटू शकतो. जीत आणि जेते याच भूमिकेतून इतिहास बघितला तर तेढ राहणारचं.