भिगवण : उजनी धरण क्षेत्रात परप्रांतीय मच्छीमार हटविणे तसेच मांगूर माशाच्या संवर्धनावर बंदी आणून सौरऊर्जा प्रकल्प उजनी धरणातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी जयमल्हार क्रांती संघटना आणि महाराष्ट्र राज्य मासेमार संघटनेच्या वतीने डिकसळ येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांनी १० दिवसांत यातील काही मागण्या सोडविण्याच्या आश्वासनाने आंदोलन मागे घेतले.उजनी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मासेमार मासेमारी करताना आढळून येतात तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर लहान माशाची शिकार केली जाते. यामुळे दिवसेंदिवस उजनीतील माशांचे प्रमाण घटत आहे. स्थानिक मासेमारांना उपासमार सहन करावी लागत आहे. तर परप्रांतीय मासेमारांकडून होणारे गुन्हेगारीचे प्रमाणही जास्तीचे आहे. त्यामुळे या परप्रांतीय मासेमारांना उजनीतून हाकलून देण्यासाठी गेली १० वर्षे महाराष्ट्र राज्य मासेमार संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे मच्छीमार विभागाकडे असणारे उजनी धरण काही वर्षांपूर्वी सुरक्षेच्या कारणासाठी जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आले असतानाही सुरक्षेला बाधक असणाऱ्या परप्रांतीयांना हटविण्यात जलसंपदा विभाग यशस्वी झाला नाही. यामुळे अखेर जय मल्हार क्रांती संघटनेच्या दौलत शितोळे यांनी आंदोलनात उडी घेत अधिकाºयांना जागे करण्याचा प्रयत्न केला. या वेळी शितोळे यांच्या सोबत नंदू नगरे, सीताराम भोई, राजू नगरे यांनी वांरवार अधिकाºयांना याबाबत माहिती दिली होती. मात्र, सरकारी अनास्थेमुळे अखेर या दोन्ही संघटनांनी टोकाचे पाऊल उचलीत जलसमाधी आंदोलनाचा पर्याय निवडला. आज या आंदोलनाला हजारो मासेमारांनी पत्नी आणि आबालवृद्धांसह आंदोलकांत सहभाग नोंदविला. तसेच राज्यातील अनेक संघटनांनी तसेच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सहभाग नोंदवीत पाठिंबा जाहीर केला. या वेळी बोलताना दौलत शितोळे यांनी जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे गरीब मासेमारांवर अन्याय होत आहे. अन्याय सहन करण्याला मर्यादा असतात. त्यापेक्षा ज्या पाण्यावर आपले जीवन आहे त्यातच जीव देण्याचा मासेमार विचार करीत असल्याचे सांगितले. या वेळी करमाळा तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, उपविभागीय कार्यकारी अभियंता एन.आर. शिर्के तसेच जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
उजनीत मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 2:40 AM