घोडेगाव : भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोजण्या, नकाशे, योजना पत्रक, फाळणी अशी विविध कामे ठप्प पडली आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात याचा परिणाम दिसू लागला असून, नागरिकांना दररोज कार्यालयात चकरा मारून निघून जावे लागत आहे. भूमिअभिलेख कार्यालयाशी शेतकरी, जमीन मालक, घर मालक यांचा नेहमी संपर्क येत असतो. मोजणी, फाळणीबारा, योजनापत्रक, गटनकाशे, चतु:सीमा, नवीन मोजण्या अशी महत्त्वाचे कामे या कार्यालयाकडून होत असतात. मात्र, दि. १६ जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्यात भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे तांत्रिक वेतनश्रेणी मिळावी याबरोबरच २७ मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असल्याने एकही कर्मचारी कार्यालयात येत नाही. त्यामुळे कार्यालयांना कुलपे लावलेली आहेत. ही कार्यालये बंद असल्यामुळे मोजणीची कामे ठप्प पडली आहेत. अनेक मोजण्या रखडल्या आहेत, प्रॉपर्टीकार्डच्या नोंदी थांबल्या आहेत, चतु:सीमा मिळत नाहीत. लोकांना सतत आवश्यक असलेली कागदपत्रे मिळत नाहीत. दररोज हेलपाटे मारून नागरिक वैतागले आहेत. मोजणी करण्यासाठी तारखा दिल्या होत्या. या तारखांना मोजणी झाली नसल्याने लोकांना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागतील व या अर्जाबरोबर पुन्हा मोजणी फीसुद्धा भरावी लागणार आहेत. त्यामुळे लोकांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे. (वार्ताहर)दस्त रखडले; प्रशासनाचा बुडतोय महसूल४भूमिअभिलेख कार्यालय बंद असल्यामुळे खरेदी-विक्री व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. खरेदी-विक्रीसाठी आवश्यक असलेले प्रॉपटीकार्ड मिळत नसल्याने अनेक दस्त थांबून आहेत. तसेच, शासनाचा महसूलही बुडत आहे. एकट्या आंबेगाव तालुक्यात ७० ते ८० मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत बंदमुळे लोकांचे हाल होत आहेत. हा बंद कधी उठणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. आंदोलनाचा सोळावा दिवस४सहा महसूल विभागांपैकी विदर्भ वगळता सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सर्व संघटना एकत्र येऊन मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलनाबाबत प्रधान सचिव मनोजकुमार श्रीवास्तव यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आहे. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याशी चर्चा झालेली नाही.४सुरूवातीला हे आंदोलन पुणे विभागाने सुरू केले होते. आता संपूर्ण राज्यातील महसूल कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत, अशी माहिती भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष सतीश भाटे यांनी दिली.