जांभूळवाडी, कोळेवाडीतील गावकऱ्यांची व्यथा
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जांभूळवाडी आणि काळेवाडीच्या पिण्याच्या पाण्याची मदार गावातील नैसर्गिक तलावावर होती. परंतु गृहनिर्माण सोसाट्यांमधील सांडपाणी थेट या तलावात सोडले जात असल्याने त्याला गटाराचे स्वरूप आले आहे. महापालिकेने याची गंभीर दखल घेऊन तलाव स्वच्छ करावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
एरवी शुद्ध पाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या तलावात दलदल झाली आहे. तलावाच्या सुमारे साडेतीन एकर जागेवर अतिक्रमण आहे. पाटबंधारे आणि भूमिअभिलेख खात्याने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने गावाचे मोठे नुकसान झाले. दक्षिण पुण्याचे वैभव असलेल्या या तलावाचे सुशोभीकरण कधी होणार, असा गावकऱ्यांचा सवाल आहे.
सुमारे दहा हजार लोकसंख्येच्या या गावात अजूनही पायाभूत सुविधांची वानवा आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून टाकीसाठी पावणेतीन कोटी रुपये मंजूर झाले मात्र कोविडमुळे काम सुरू न झाल्याने नागरिक हैराण आहेत. दरीपुलाच्या अलीकडचा भाग पालिका हद्दीत असूनही विकासकामांच्या दृष्टीने तो ग्रामपंचायतीकडेच आहे. गावात वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यासाठी जागा नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. शेजारच्या आंबेगावला गावठाण मिळाले मग आम्हाला का नाही, शाळेला जागा नसल्याने प्राथमिक शाळेचा निधी जिल्हा परिषदेकडे पडून आहे. पायाभूत सुविधांसाठी जागा आणायची कुठून, असा प्रश्न नागरिकांनी ʻलोकमतʼकडे उपस्थित केला.
विलिनीकरणाबाबत नागरिक म्हणाले की, भूमिगत गटार आणि कचरा उचलण्यासाठी घंटागाडी यासाठी पालिकेने प्रयत्न करावे. गावाशेजारून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे गावातून बाहेर पडण्यासाठी दरीपूलाची व्यवस्था करण्यात आली, मात्र राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने सेवारस्ता दिला नसल्याने डोंगरापलीकडून वळसा मारत यावे लागते.
जांभूळवाडी आणि कोळेवाडी परिसरातील वाढत्या लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधांचा विकास व्हावा. खडकवासल्यातून पाणी देण्यासाठी नियोजन करावे.
कोळेवाडी हा आदिवासीबहुल व निसर्गरम्य परिसराचे सौंदर्य शहरीकरणाने नष्ट होण्याची भीती आहे. खंडोबा मंदिर, वीरालयम आणि हत्तीचा डोंगर या पर्यटनस्थळांचा विकास गरजेचा असल्याचे नागरिक म्हणतात.
चौकट
कोट
गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम असून गाव पातळीवर आम्ही विकास करण्यास सक्षम असल्याने आमचा समावेश महापालिकेत होऊ नये. सरकारच्या निर्णयाला विरोध आहे.
- वनिता जांभळे, सरपंच
चौकट
गावातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पर्यटनस्थळांचे जतन व संवर्धन व्हावे. हत्तीचा डोंगर ते खंडोबा डोंगर या दरम्यान रोप-वे बांधल्यास पर्यटनाला चालना मिळेल.
-शंकरराव बेलदरे, माजी नगरसेवक
फोटो ओळ : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या बाजूला गावासाठी सेवा रस्ता नसल्याने वाहनचालकांना गावात येण्यासाठी मोठा वळसा मारावा लागतो.