-संतोष गाजरे
पुणे - काश्मीरमधील पहलगाम परिसरात शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पुण्यातील व्यावसायिक कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने पुण्यात शोककळा पसरली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, कौस्तुभ गनबोटे हे पत्नी व मित्रांसह पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला गेले होते. पहलगाममधील बैसरण घाटी परिसरात ते हॉटेलच्या बाहेर बसले असताना अचानक दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या अंदाधुंद गोळीबारात गनबोटे यांच्या कमरेखाली गोळी लागली, तर संतोष जगदाळे यांच्या खांद्याजवळ गोळी लागली.
घटनेनंतर जवळपास अर्धा तास कोणतीही मदत मिळाली नाही.ॲम्बुलन्स, सुरक्षा यंत्रणा वेळेत मदतीला आल्या नाही. त्यामुळे जखमी गनबोटे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना शुगरचा त्रास असल्यामुळे रक्त थांबत नव्हते. त्यांच्या पत्नी या परस्थितील दृश्ये पाहून हादरल्या होत्या. अर्धा तासानंतर गनबोटे यांना मदत मिळाली असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कौस्तुभ गनबोटे हे गेली ३० वर्षे 'गनबोटे फरसाण हाऊस' या नावाने व्यवसाय करत होते. त्यांचा मुलगा कुणाल वडिलांवर हल्ल्याची माहिती मिळताच तात्काळ विमानाने काश्मीरकडे रवाना झाला. कौस्तुभ गनबोटे यांचा मृतदेह आज विमानाने पुण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती आहे.