पुणे : ३१ डिसेंबरला वर्षअखेर व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर गर्दी करतात. वाहनांवरून वेगाने जाणे, हुल्लडबाजी करण्याचे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, महात्मा गांधी रस्त्यावर ३१ डिसेंबरला सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात येणार आहे.
गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मुख्य गेट, झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक (पुलगेट चौकी) दरम्यान वाहनांना प्रवेशास बंदी घालण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक अन्य रस्त्यांवर वळविण्यात येणार आहे.
वाहतुकीत करण्यात आलेले बदल
- पुणे कॅम्प भागात दि. ३१ डिसेंबरला सायंकाळी सात वाजल्यापासून ते गर्दी संपेपर्यंत करण्यात येणारे वाहतुकीचे डायव्हर्शन
- वाय जंक्शनवरून एमजी रोडकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
- ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
- व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.
- इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून यावरील वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
- सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक ताबूत स्ट्रीटरोडमार्गे पुढे सोडण्यात येणार आहे.
नववर्ष दिनी शिवाजी रोडवरील वाहतुकीत बदल
नववर्षानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री उशिरा गर्दी संपेपर्यंत शिवाजी रोडवर चार चाकी वाहने व सर्व प्रकारच्या बसगाड्यांना वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे टिळक रोडचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.