भीमाशंकर : हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar Temple) येथे शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. या वेळी शिवलिंगावर आकर्षक रंगीबेरंगी फुलांची व केळींच्या पानांची सजावट करण्यात आली. भीमाशंकर परिसरात श्रावण सरी व दाट धुक्यामध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती. (Shravan Somvar)
सोमवार (आज) पहाटे साडेचार वाजता मंदीर उघडण्यात आले. गाभारा मंदिर व परिसराची साफसफाई झाल्यानंतर पाच वाजेच्या दरम्यान शिवलिंगावरती दुग्ध व महाजलाभिषेक पुजा करण्यात आली. या नंतर शंखनाद करत महाआरती करण्यात आली. यावेळी श्री क्षेञ भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अॅड सुरेश कौदरे भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे उपस्थित होते. महाआरती झाल्यानंतर लगेचच मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
शुक्रवारी नागपंचमी शनिवारी दुसरा शनिवार रविवारी अशा सलग तीन दिवस सुट्ट्या व त्यामध्येच दुसरा श्रावणी सोमवार आल्याने भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याची पहावयास मिळाली. भाविकांचा शनिवारचा ओघ पाहता रविवारी पहाटेपासूनच सायंकाळी दहा वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती. पार्किंग नंबर चार व पाच या दोन्ही फुल झाल्यानंतर सुमारे दीड ते दोन कीलोमीटर अंतरापर्यंत म्हणजे तेरुंगण फाट्या पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुसळधार पाऊस व त्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी काढता काढता एस. टी. महामंडळाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांची दमछाक होत होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या ९ मिनीबस व २६ मोठ्या बस ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे भाविकांना फार वेळ थांबावे लागत नव्हते. सहाय्यक वाहतुक निरिक्षक प्रशिक्षण पुणे मारुती खळदकर व सहाय्यक वाहतुक अधिक्षक तुकाराम पवळे हे वाहतुकीचे उत्तम असे नियोजन करत होते. दर्शनाची रांग ही जुन्या एमटीडीसी पर्यंत येवुन पोहोचली आहे. शिवलिंगाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी देवस्थानकडून व्ही आय पी दर्शन पास व मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन रांगेत उभे राहून दर्शनासाठी वेळ लागत असल्यामुळे जास्त मुखदर्शन घेऊनच परतत आहेत. यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खेड आंबेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे व सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वाहनतळे बस स्थानक, पायऱ्या, मंदिराचा परिसर, दर्शन बारी गाभाऱ्यामध्ये पोलीस तैनात करण्यात आले असुन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.