पुणे : मोक्का लागलेला आणि गेल्या साडेचार महिन्यांपासून फरार असलेल्या टोळी प्रमुखाला पकडण्यात अखेर गुन्हे शाखेच्या युनिट १ ला यश आहे. विशाल उर्फ जंगल्या सातपुते असे या आरोपीचे नाव असून, तो संघटित गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहे. ५ एप्रिल रोजी जंगल्या उरूळीकांचन परिसरात लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अमोल पवार यांनी मिळाली होती. त्यांनी याबाबत युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना माहिती दिली असता, त्यांच्या आदेशाना उरूळीकांचन येथून जंगल्या सातपुतेला अटक करण्यात आली.
२४ नोव्हेंबर २०२२ रोजी उमेश वाघमारे नामक व्यक्तीला वस्तीतून गाडी सावकाश घेऊन जा असे फिर्यादीने सांगितले असता, वाघमारेने मी या वस्तीचा भाई आहे तुला माहिती नाही का ? आमचा भाई जंगल्या सातपुते जेलमधून सुटून आला आहे. त्याने तुझ्याकडून ४० हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले आहे, असे धमकावले. त्यावर तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिला असता, तुला अर्ध्या तासात दाखवतो म्हणून उमेश वाघमारे, आदित्य बनसोडे, मंदार खंडागळे, कुमार लोंढे यांनी त्यांचा साथीदार आणि टोळी प्रमुख जंगल्या सातपुते याच्या सांगण्यावरून कोयते, लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने फिर्यादीला मारहाण करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान हे संघटीत गुन्हेगार एका टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले होते. गुन्ह्यातील दाखल सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती, मात्र जंगल्या तेव्हापासून फरार होता. त्याला बुधवारी पोलिसांनी अखेर अटक केली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट १ चे निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, आण्णा माने, नीलेश साबळे, शुभम देसाई, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे आणि तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.