पुणे : शिक्षण म्हटले की डोळ्यासमोर पहिल्यांदा उभी राहते ती शाळा. शाळेतले शिक्षक, फळा, खडू, झुंडीने वर्गातून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि तासागणिक बदलणारी घंटा अशा असंख्य आठवणी समोर येतात. मात्र शाळेच्या याच चाकोरीबद्ध मांडणीवर न भुलता जान्हवी पतकी या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवत यश संपादित केले आहे.
शिक्षणासाठी शाळाच आवश्यक आहे अशी सर्वसाधारण धारणा असताना जान्हवीचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. यात तिचे शिक्षक बनलेले वडील ऋतुराज आणि आई नीलिमा यांचा मोठा वाटा आहे. इयत्ता दुसरीपासून, घरून शाळाबाह्य शिक्षण घेऊन पहिल्यांदाच दहावीला ती अधिकृत परीक्षेला सामोरी गेली. मात्र केलेल्या शाळेत न जात घरी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. जान्हवीने कोल्हापूर विभागातून परीक्षा दिली होती.
याबाबत तिचे वडील म्हणाले की, मुळात मी आणि माझ्या पत्नीने आमचे शिक्षण पारंपरिक पद्धतीनेच पूर्ण केले होते. त्यामुळेच शाळा चाकोरीबद्ध शिक्षणाच्या संकल्पना मोडून तिला विचारांना चालना मिळेल असा आमचा विचार होता. घोकंपट्टीसोडून तिला मुळातून विषय समजावेत अशी आमची इच्छा होती आणि त्यामुळेच तिला घरी शिकवण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघेही व्यवसाय करत असल्यामुळे तिला पुरेसा वेळही देऊ शकलो. फक्त एसएससी नाही तर आयसीएसई आणि सिबीएसई बोर्डाच्या पुस्तकांचाही अभ्यास तिने केला.
तिच्या आई म्हणाल्या की, ' सुरुवातील आम्हालाही हा प्रयोग करताना धाकधूक होतीच. शिवाय अगदी घरातूनही आमच्या प्रयोगावर शंका उपस्थित झाल्या होत्या. मात्र तिला पूर्ण समजेल असे प्रयोगातून आम्ही शिक्षण दिले आणि आज त्याचे फळ मिळाले आहे. घरात शिकवताना आम्ही तिला जास्तीत जास्त गोष्टींना अनुभव देण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या देशात फिरताना तिथली घरं, माती, शेतीच्या पद्धती असे अनेक मुद्दे तिला अनुभवातून आकलन झाले. शाळा नसली तर मित्र- मैत्रिणी नसतील का किंवा ती एकलकोंडी होईल का असाही मुद्दा अनेकांनी मांडला होता. मात्र असं काहीही झालं नाही. आज तिला एकच नाही तर अनेक शाळांमधले मित्र-मैत्रिणी आहेत. शेवटी मैत्री ही परस्पर वागण्यातून जपली जाते.
शाळेचे बंधन नाही,अभ्यासाचा आनंद होता
या निकालाबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, 'मला अभ्यास करताना शाळेचे बंधन नाही तर खूप खूप आनंद मिळाला. मी कितीतरी नवीन गोष्टी रोज शिकत होते. मला नाही समजलं तर आम्ही तो विषय समजेपर्यंत शिकत असू. त्यामुळे आज माझ्या सगळ्या संकल्पना स्पष्ट आहेत. मला पहिल्यांदा परीक्षा, पुरवणी, हॉलतिकीट अशा गोष्टी दहावीत समजल्या. आज मिळालेल्या यशात माझ्या इतकाच वाटा आई बाबांचा आहे.