पुणे : केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित लोकशाही आघाडी सरकारच्या चार वर्षांच्या अपयशी कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जनतेच्या हितासाठी जनसंघर्ष यात्रेस सुरुवात झाली आहे. गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते जनसंघर्ष रथाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुणे शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, आमदार अमर राजूरकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड, अभय छाजेड, गटनेते अरविंद शिंदे, रोहित टिळक, नीता रजपूत, नगरसेवक आबा बागुल, रवींद्र घेणेकर, मनीष आनंद, अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवार (३१) पासून कोल्हापूर येथून सुरू होणार आहे. या यात्रेस लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत. याबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी होणार आहेत.६ सप्टेंबर रोजी जनसंघर्ष यात्रेचे रथ पुणे शहरातील पर्वती, कसबा, शिवाजीनगर, कँन्टॉन्मेंट व हडपसर या मतदार संघात जाणार आहे. ७ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे जाहीर सभा होणार असून ८ सप्टेंबर रोजी या यात्रेचा समारोप सभा पुण्यात होणार आहे.नक्षलवादाच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड सनातन संस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी केली जात असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात सरकार कठोर कारवाई का करत नाही, असा सवालही त्यांनी केला. भिडे यांना कुठल्याही चौकशीविना मुख्यमंत्री क्लीन चिट देतात हे कशाचं लक्षण आहे, या उलट सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणाऱ्या विचारवंतांची मात्र धरपकड केली जातेय.