पुणे : पुरोगामी संघटनांमध्ये कॉंग्रेसला पाठिंबा द्यायचा की वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यायचा याविषयी संभ्रम असल्याचे सांगितले जात आहे. परंतू, कॉंग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपाचे गिरीश बापट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुरोगामी संघटना वंचित आघाडीलाच समर्थन देतील. या निवडणुकीत जनशक्ती धनशक्तीचा पराभव करणार असल्याचा विश्वास उमेदवार अनिल जाधव यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीला पँथर संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय नडगेरी, उत्तम बनसोडे, जालिंदर वाघमारे आदी उपस्थित होते. संघटनेने पुणे, शिरुर, उस्मानाबाद, सोलापूर या चार मतदार संघांमध्ये वंचितला पाठिंबा दिल्याचे यावेळी नडगेरी यांनी सांगितले. पँथरच्या जेथे जेथे शाखा आहेत त्या ठिकाणी, तसेच दलित, मुस्लिम बहुल भागात प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचेही नडगेरी यांनी स्पष्ट केले. पँथरचा पाठिंबा मिळणे हा अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या विचारांना मिळालेली ताकद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार घेऊन वंचित आघाडी निवडणुकीत उतरली असून दलित-उपेक्षितांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे चळवळीतील संस्था-संघटनांनी साथ देणे आवश्यक आहे. सर्वजण एकत्र होऊन लढलो तर ती डॉ. आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल असे जाधव यावेळी म्हणाले. लवकरच आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या सभा पुण्यात होणार आहे. ====एकेकाळी उपेक्षित आणि कष्टकरी वर्गातील कार्यकर्ते कॉंग्रेस आणि भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रचार करायचे. मात्र, तेच कार्यकर्ते आज वंचित बहुजन आघाडीसोबत असून त्यांच्या मनामध्ये प्रस्थापितांविरुद्ध रोष वाढत चालला आहे. कॉंग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपाचे गिरीश बापट हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुरोगामी संघटनांना एकत्र घेऊन धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आवाज बुलंद करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - अनिल जाधव, उमेदवार, वंचित आघाडी
जनशक्ती धनशक्तीचा पराभव करणार : पँथर संघटनेचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 3:10 PM
कॉंग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपाचे गिरीश बापट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
ठळक मुद्देकॉंग्रेस-भाजपाचे कार्यकर्ते आमच्यासोबतच पुणे, शिरुर, उस्मानाबाद, सोलापूर या चार मतदार संघांमध्ये वंचितला पाठिंबा लवकरच आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या सभा पुण्यात होणार