पुणे : आमचे १५ आमदार निवडून आले तर आम्ही सत्तेत सहभागी होऊन सत्ताधाऱ्यांना आमचा अजेंडा राबवायला लावू. त्यात शेतकरी, शेतमजूर यांना योग्य दर द्यायला लावू, असे स्पष्ट करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा जाहीरनामा प्रकाशित केला. मनोज जरांगे यांनी घरंदाज मराठ्यांच्या दबावाखाली निवडणुकीतून माघार घेत रयतेमधील मराठ्यांवर अन्याय केला, असेही ते म्हणाले. कोणाला पाडायचे व कोणाला निवडायचे, हे जरांगे यांनी स्पष्ट करावे, असे आवाहनदेखील केले.
आंबेडकर यांच्यावर पुण्यात नुकतीच शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर मंगळवारी प्रथमच पुण्यातील निवासस्थानी पत्रकारांसमोर येत त्यांनी वंचितचा जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी वंचितचे कॅन्टोन्मेंटमधील उमेदवार नीलेश आल्हाट, हडपसर - ॲड. अफरोज मुल्ला, वडगाव शेरी - विवेक लोंढे, कसबा - प्रफुल्ल गुजर, कोथरूड - योगेश राजापूरकर, पर्वती - सुरेखा गायकवाड, खडकवासला - संजय धिवार तसेच शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे उपस्थित होते. जाहीरनाम्यातील अनेक योजना आंबेडकर यांनी वाचून दाखवल्या.
आंबेडकर म्हणाले की, “बोगस आदिवासी दाखले रद्द करू, हक्काच्या लोकांना त्यांचे घर देऊ, जात जनगणना करून भटके विमुक्त तसेच अनुसूचित जाती जमातींची संख्या ठरवून त्यांच्यासाठी धोरणे आखू, सर्व परीक्षांचे शुल्क फक्त १०० रुपये असेल. वंचित, शोषित यांच्या हितासाठीच्या योजना राबविण्यावर आमचा भर असेल. रोजगार हमी योजनेत सोयाबीन जमा करणाऱ्या व कापूस वेचणाऱ्या मजुरांचा समावेश करू, अशा योजनांचा आमच्या जाहीरनाम्यात समावेश केला आहे. सत्तेत सहभागी होऊन या योजना राबवण्यावर आम्ही भर देऊ.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या धोरणावर आंबेडकर यांनी प्रतिकूल मत व्यक्त केले. कोणालाही मत द्या ते काकाला किंवा पुतण्याला जाईल. त्यापेक्षा जरांगे यांनी कोणाला मतदान करायचे आणि कोणाला नाही, याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. वंचितला या निवडणुकीत चांगले यश मिळेल. आमचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.