पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित अठराव्या स्वरसागर महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पद्मविभूषण पंडित जसराज यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी गायनाचा प्रारंभ राग ‘पूरिया’ने केला. ‘फूलन के हरवा’ ही विलंबित लयीतील बंदीश सादर करताना त्यांच्या दमदार गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. आजही त्यांची स्वरांवरील पकड, स्वरलगाव, सादरीकरण रसिकांना भारावून टाकणारे होते. त्यानंतर त्यांनी द्रुत लयीत ‘श्यामकुंवर मोरे घर आये’ ही बंदीश सादर केली. राग बहारमधील विविध फुलांचे वर्णन करणारी एक बंदीश सादर केल्यानंतर त्यांनी दोन भजने सादर केली. श्रीकृष्णाची आळवणी करणारे ‘ब्रजे वसंत नवनीत चौरं, गोपांगनांचं गोकुलचौरं’ हे संस्कृत भजन आणि पंडित जसराज यांचेच सुप्रसिद्ध ‘ओम नमो भगवते वासुदेवायं’ ही दोन भजने सादर करून वातावरण भक्तिमय केले. पंडित जसराज यांना संवादिनीची साथ मुकुंद पेटकर यांनी, तबलासाथ केदार पंडित यांनी, पखवाजाची साथ श्रीधर पार्थसारथी यांनी, टाळाची साथ सुरेश पत्की यांनी केली. तसेच गायन साथ रतनमोहन शर्मा आणि अंकिता जोशी यांनी केली. राहुल देशपांडे यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी राग ‘पूरियाधनाश्री’ सादर केला. (प्रतिनिधी)
जसराजांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
By admin | Published: December 23, 2016 12:31 AM