जातेगाव खुर्द येथील नागरिकांना वारंवार या भागात बिबट्या दिसत होता.या भागामध्ये एकाच वेळी दोन बिबटे दिसून येत असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार शिरूर वनविभागाच्या वतीने जातेगाव खुर्द येथील तांबेवस्ती येथे ग्रामपंचायत सदस्य महेश मासळकर यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला होता.सोमवारी सकाळच्या सुमारास महेश मासळकर यांचे वडील रमेश मासळकर हे शेतात गेलेले असताना त्यांना बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला असल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भाडळे, सर्पमित्र शेरखान शेख, सर्पमित्र अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, या ठिकाणी नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती.यावेळी नागरिकांना शांततेचे आवाहन करत बिबट्याला नागरिकांच्या मदतीने शिरूर वनविभागाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करत जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यावेळी जातेगाव खुर्दचे उपसरपंच विकास मासळकर, पोलीस पाटील कृष्णा गाजरे, माजी सरपंच समाधान डोके, ग्रामपंचायत सदस्य महेश मासळकर, गणेश मासळकर, प्रवीण मासळकर, गणेश तांबे, प्रवीण कौटकर, गोरक्ष तांबे, ऋषिकेश तांबे, सचिन तांबे, भूषण घोलप, अभिजित मासळकर, संजय मासळकर, ज्ञानेश्वर तांबे, संग्राम चव्हाण, माउली मासळकर, सुहास मासळकर, समीर मासळकर, शहाजी मासळकर यांसह आदी उपस्थित होते. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक संतोष शिंदे, प्रताप कांबळे यांनी देखील सदर ठिकाणी धाव घेत गर्दीवर नियंत्रण आणून नागरिकांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्याची व्यवस्था केली जाईल, असे वनरक्षक बबन दहातोंडे यांनी सांगितले.
जातेगाव खुर्द येथे पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या ताब्यात घेताना वनविभागाचे कर्मचारी व पिंजऱ्यातील बिबट्या. (धनंजय गावडे)