पुणे: देशभरात सध्या दाक्षिणात्य निर्मित असलेल्या 'जय भीम' या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे जय भीम या चित्रपटाला आयएमडीबीने 9.6 अशी रेटींग दिली आहे, जी भारतीय चित्रपटांमधील सर्वोकृष्ठ ठरली आहे. हा चित्रपट पाहण्याचा आनंद पुणे ग्रामीण पोलिसांनीही घेतला आहे. जय भीम चित्रपटाला एवढी प्रसिद्धी मिळत असताना आज पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक यांचे सोबत गुन्हे आढावा बैठकीमध्ये 'जय भीम' चित्रपट पाहिल्याची माहिती पोलिस अधिक्षक अभिनव देशमूख (abhinav deshmukh pune rural police) यांनी फेसबूकवर पोस्ट करत दिली. ( highest imdb rating jay bhim movie)
या चित्रपटाबद्दल बोलताना देशमूख म्हणाले, यामध्ये अतिशय प्रभावीपणे, तामिळनाडूमध्ये 1995 मध्ये झालेल्या एका उच्च न्यायालयातील खटल्याची गोष्ट मांडण्यात आली आहे. स्वतःच्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारी सेंगणी, तिची बाजू कोर्टासमोर प्रभावी पणे मांडून तिला न्याय मिळवून देणारे वकील चांद्रू आणि सर्व दबाव झुगारून निपक्षपातीपणे तपास करून सत्य न्यायालयासमोर ठेवणारे पोलीस अधिकारी पेरीमल स्वामी या कथेतील प्रमुख नायक आहेत. पण कथेचा आत्मा बाबासाहेबांनी दिलेली भारतीय राज्यघटना, तिने प्रत्येक भारतीयाला, विशेषतः समाजातील दुर्बल, वंचित घटकांना दिलेले मूलभूत अधिकार आहेत. ते अधिकार प्रत्यक्षात अमलात येण्यासाठी, व्यवस्थे विरुद्ध लढा देण्याची क्षमता आणि प्रेरणा देखील बाबासाहेबांच्या विचाराने नायकामध्ये निर्माण झाली आहे.
तसेच पुढे जय भीम चित्रपटाबद्दल लिहताना पोलिस अधिक्षक अभिनव देशमूख म्हणाले, पोलीस कोठडीमधील अत्याचार, पोलीस तपासामध्ये वैज्ञानिक पद्धतींचा वापराचा अभाव, गुन्हेगारी जमात हा ब्रिटिश काळातील शिक्का मिटवण्याची आवशक्यता, अजूनही अस्तित्वात असणारी जातीय विषमता असे अनेक विषय हा चित्रपट अतिशय प्रभावीपणे अधोरेखित करतो. अतिशय अंतर्मुख करणारा अनुभव या चित्रपटाने दिला. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा नायक वर्तमानपत्र वाचण्यासाठी हातात घेतो, तेव्हा निरक्षर आणि आदिवासी संगिनीची सहा वर्षाची पोरं देखील त्याच ऐटीत वर्तमानपत्र हातात घेते, तो क्षण भविष्याविषयी नवी आशा आणि उमेद जागवणारा असल्याची भावना देशमूख यांनी मांडली. तसेच सर्वांनी पाहावाच असा हा चित्रपट असल्याचेही देशमूख म्हणाले.