दीपक मुनोत पुणे: कोरोनाच्या प्रतिकारासाठी सिरम इन्स्टीट्युटने तयार केलेल्या ʻकोविशिल्डʼ या लसीचे चार कंटेनर आज देशांतर्गत वापरासाठी कंपनीतून पहाटे ४.५०वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले. कंपनीचे मांजरी कार्यालय ते लोहगाव या वाहतुकीसाठी विशेष पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला होता.
कोरोना महामारीवर उपयुक्त ठरणाऱ्या या बहुप्रतिक्षित लसीची जगभरातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आवश्यक ते सर्व सरकारी सोपस्कार पार पाडत ʻसिरमʼ कंपनीने ही लस देशांतर्गत नागरिकांना वापरासाठी आजपासून उपलब्ध करून दिली.
कंपनीच्या मांजरी येथील कार्यालयाच्या प्रांगणात, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंटेनरची पूजा केल्यानंतर या कोल्ड चेन व्हॅन लोहगाव विमानतळाकडे रवाना झाल्या.
पहिल्या टप्प्यात, या लसीचा वापर हा प्रामुख्याने कोरोना वॉरियर्ससाठी करण्यात येणार आहे. कंपनीला सुरवातीला, २ कोटी डोसची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी ६५ लाख डोस आज देशभरातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.लस वाहतुकीसाठी विशेष प्रकारच्या कोल्ड चेन व्हॅन वापरण्यात आल्या. ही लस २ ते ८अंश सेल्सियस इतक्या तापमानात ठेवणे आवश्यक असल्याने या व्हॅनमधून तितके तापमान नियंत्रित करण्यात आले आहे. कंपनीच्या स्वत:च्या आणि भाडे तत्वावरील व्हॅन लस वाहतुकीसाठी वापरण्यात आल्या.
लोहगाव विमानतळावरून लगेचच देशातील विविध राज्यांमध्ये विमानांद्वारे या लसीची वाहतुक करण्यात येईल, अशी माहिती, सिरम इन्स्टिट्यूटचे सहायक निर्यात अधिकारी हनुमंत अलकुंटे यांनी दिली.