दीपक जाधवपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित जयकर ग्रंथालयामध्ये नवीन पुस्तकांचे वर्गीकरण करून जागेवर ठेवण्यास कर्मचाºयांना वेळ नसल्याने हजारो पुस्तके धूळ खात पडून आहेत. यामुळे ग्रंथालयाचा अनागोंदी कारभार उजेडात आला आहे.अनेक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना असलेल्या जयकर ग्रंथालयाची ख्याती राज्यभर पसरलेली आहे. संदर्भग्रंथ मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून लांबवरून लोक जयकरमध्ये येतात. मात्र, ग्रंथालयाच्या या ख्यातीला गालबोट लावण्याचे काम काही वर्षांपासून होत असल्याचे दिसून येत आहे.विद्यापीठामध्ये प्रत्येक विभागाच्या स्तरावर एक ग्रंथालय आहे. त्याचबरोबर जयकर हे सर्व विभागांच्या पुस्तकांचा समावेश असलेले मुख्य ग्रंथालय आहे. विद्यापीठांमधील अभ्यासक्रम सतत बदल असतो, त्यामध्ये नवीन ज्ञान, तंत्रज्ञानाचा समावेश केला जातो. त्यानुसार पुस्तके, गं्रथ यामध्येही बदल होतात. विभागांनी केलेल्या शिफारशींनुसार जयकर ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाकडून या पुस्तकांची खरेदी केली जाते. मात्र, त्या पुस्तकांचे वर्गीकरण करण्यासाठी वेळ नसल्याने ते धूळ खात पडत असल्याचे चित्र दिसून येते. जयकर ग्रंथालयास अनेक पुस्तके भेट म्हणून दिली जातात. मात्र इथे नवीन पुस्तकांचेच वर्गीकरण होत नसल्याने या भेट मिळालेल्या पुस्तके उपलब्ध होण्याची कार्यवाही होणे तर आणखीनच दूरची गोष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते उपलब्ध होऊ शकत नाहीत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी याबाबत सांगितले, ‘‘जयकर ग्रंथालयामध्ये नवीन पुस्तकांचे वर्गीकरण करून त्याची कार्यवाही सुरू आहे. शनिवारी व रविवारी जास्तीचा वेळ देऊन वर्गीकरणाचे काम पूर्ण करण्यास सांगण्यात आलेले आहे.’’विद्यार्थ्यांकडून वापर कमीजयकर ग्रंथालयामध्ये अभ्यासासाठी आवश्यक असलेली अद्ययावत पुस्तके उपलब्ध होत नसल्याने जयकर ग्रंथालयाचा वापर कमी होऊ लागल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. वर्गीकरण झालेली पुस्तकेही जागेवर मिळत नसल्याने ती शोधण्यामध्येच विद्यार्थ्यांचा खूप वेळ वाया जातो. त्यामुळे पुस्तकांसाठी जयकर ग्रंथालयात जाण्याचे बहुतांश विद्यार्थ्यांकडून टाळले जात आहे. जयकरऐवजी विभागाच्या ग्रंथालयातील पुस्तकांवरच त्यांना अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे जयकर ग्रंथालयाने नवीन पुस्तकांची नियमित खरेदी करणे, त्याचबरोबर त्यांचे वेळेत वर्गीकरण करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले....तर लॉकर खरेदीकशासाठी केली?जयकर ग्रंथालयातील वाचन कक्षामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य ठेवता यावे यासाठी पैसे खर्च करून लॉकरची खरेदी करण्यात आली. विद्यार्थ्यांना लॉकर दिले तर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण पुढे करून ते विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी देण्यात आलेले नाही. जर विद्यार्थ्यांना लॉकर वापरण्यासाठी द्यायचेच नव्हते तर लाखो रूपये खर्च करून त्याची खरेदी कशासाठी केली, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
‘जयकर’मध्ये हजारो नवीन पुस्तके धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 6:13 AM