लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टतर्फे पुरस्कृत वरिष्ठ गटाच्या जिल्हा मैदानी स्पर्धेत जयकुमार गावडे याने पुरुष गटामध्ये १०० मीटर धावण्याची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळविला. महिलांत दीपिका कोटियन वेगवान धावपटू ठरली. म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत युनिक स्पोर्ट्सच्या जयकुमारेने १०.९ सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. युनिक स्पोर्ट्सच्याच प्रतीक गावडेने दुसरे, तर डेक्कन जिमखान्याच्या शुभम धुमाळने तिसरे स्थान मिळवले.तिहेरी उडीत यदी स्पोर्ट्सच्या मंगेश कदमने १२.२४ मीटर कामगिरीसह बाजी मारली. बीएसएच्या नयन वाघेलाने दुसरा आणि सुलतान शेखने तिसरा क्रमांक मिळविला. गोळा फेकमध्ये बीईजीच्या बलविंदरसिंगने प्रथम क्रमांक पटकावला. बलविंदरने १४.७० मी. कामगिरी नोंदविली.महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सेंट्रल एक्साइजच्या दीपिका कोटियनने प्रथम क्रमांक पटकावला. दीपिकाने १२.०१ सेकंदांची वेळ दिली. डेक्कन जिमखान्याच्या जान्हवी येरवडेकरने दुसरा, तर पीएसएच्या तेजश्री भगतने तिसरा क्रमांक मिळविला. महिलांच्या उंच उडीमध्ये इन्कम टॅक्सच्या जुईली बधेने विजेतेपद मिळवले. जुईलीने १.६० मीटर कामगिरी नोंदविली. तिहेरी उडीत डेक्कन जिमखान्याच्या पौर्णिमा मारणेने (१०.४९ मीटर) प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचे उद्घाटन माजी आंतरराष्ट्रीय अॅथलीट गुरूबन्स कौर यांच्या हस्ते आणि शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या रेश्मा वनमाने यांच्या हस्ते झाले.
जयकुमार गावडे वेगवान धावपटू
By admin | Published: June 10, 2017 2:18 AM