Jayant Patil: ते अजित पवारांना सांगतील आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा; जयंत पाटलांची शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 05:01 PM2024-09-09T17:01:23+5:302024-09-09T17:01:38+5:30
अजित पवारांना सोबत घेतल्याने त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे
पुणे : अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपची विश्वासार्हता कमी झाली असल्याचा दावा राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ते त्यांना आता तुम्ही थोडसं दुर ऊभं राहा म्हणू शकतील. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. आता तुम्ही वेगळी निवडणुक लढवा असंही सांगतील अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पाटील म्हणाले, महायुती अडचणीत असल्याने अजित पवार यांनी तात्पुरते वेगळं व्हावं वेगळं लढावं असं कदाचित त्यांना सांगितलं जाऊ शकतं. अजित पवारांना सोबत घेतल्याने त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे. निवडणुक झाल्यानंतर आपण परत बरोबर येऊ, असे सांगितले जाऊ शकते. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना पाटील म्हणाले, आमचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतंय. शरद पवार यांची भूमिका महाविकास आघाडी एकसंध राहायला पाहिजे अशी आहे. आमचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतंय हे खरंच आहे.
सर्वच स्तरांवर गंभीरपणे वाटचाल करायला हवी
राज्याची स्थापना झाली त्यावेळी दूरदृष्टी असणारे यशवंतराव चव्हाण यांच्याकडे नेतृत्व होते. त्यांनी अनेक निर्णय घेतले व त्यामुळे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा जलद विकास झाला. भौगोलिकदृष्ट्या राज्याला असलेले महत्त्व व सामाजिक सौहार्द यामुळेही ते शक्य झाले. आता देशातील अनेक राज्यांमध्ये विमानतळ झाले, बंदरे झाली, रस्ते तयार झाले, त्यामुळे आता स्पर्धा आहे. म्हणूनच राज्याला राजकीय आर्थिक सामाजिक अशा सर्वच स्तरांवर गंभीरपणे वाटचाल करायला हवी. तसे होताना दिसत नाही. तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे, सामाजिक सौहार्द खराब करणारी वक्तव्ये सातत्याने होणे, निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे अशा गोष्टी होत आहेत.
...तर आश्चर्य वाटायला नको
राज्याचा एकूण विचार करता राज्य आर्थिक अडचणीत आहे. तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य आहे. येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही करता आला नाही तर आश्चर्य वाटायला नको, असे स्पष्ट मत पाटील यांनी व्यक्त केले. नेत्यांची राजकीय विश्वासार्हता हाही अतिशय महत्त्वाचा विषय येत्या काळात असेल असेही ते म्हणाले.