पुणे : आज पुण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये बारामतीसाठी सुप्रिया सुळे, शिरूरसाठी अमोल कोल्हे आणि पुण्यासाठी रविंद्र धंगेकरांकडून अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडची सभा झाली.
इलेक्ट्रोल बॉन्ड हा देशातील सर्वात मोठा घोटाळा
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाले. पण विरोधक ते संसदरत्न पुरस्कार किती साधे आहेत हे दाखवण्यात धन्यता मानत आहेत. सध्याच्या सरकारने गरीब वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूंवर कर लावला आहे. जीएसटीच्या माध्यमातून सरकार सामान्य जनतेला लुटत आहेत. तसेच इलेक्ट्रोल बॉन्ड हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे.
महायुतीकडे आत्मविश्वासाची कमतरता
भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवार निश्चित करता येत नाही. आहे ते उमेदवार बलदले जात आहेत. काही उमेदवार तर आज सकाळी ठरले आहेत. महायुतीकडे आत्मविश्वासाची कमतरता आहे. देशात अन्याय पद्धतीने सगळ्या संस्था वापरण्याची पद्धत वाढत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सचिन आहिर, विश्वजीत कदम उपस्थित होते.
स्टेजवर जागा नसल्याने उमेदवार बसले रस्त्यावर-
पाटील म्हणाले, आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा पुण्यात झाल्या. महाविकास आघाडीच्या सभेसाठी पोलिसांनी जी जागा दिली ती खूपच अपुरी होती. आमच्या तीन पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत हे माहित असतानाही पोलिसांनी मोठी जागा दिली नाही. पोलिसांनी आम्हाला जरा छोट्या जागेची व्यवस्था केली आहे. पदोपदी होणाऱ्या अन्यायाकडे पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे. जागा नसल्याने आमचे उमेदवार रस्त्यावर बसले आहेत. काही हरकत नाही दिवस बदलत असतात हे लक्षात ठेवा, असंही पाटील मिश्किलपणे म्हणाले. स्टेजवर जागा कमी असल्याने निवडणुकीतील उमेदवार सुप्रिया सुळे, रविंद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे स्टेजसमोरील जागेत खाली बसले होते.