- हणमंत पाटील
पिंपरी : बैलगाडा शर्यतीवर सलग आठ वर्षे बंदी अन् कोरोनाच्या निर्बंधामुळे सर्वकाही ठप्प होते. त्यानंतरची सर्वच गावांची पहिलीच यात्रा, मग काहीतरी भन्नाट करण्याची कल्पना चिंचवडकरांना सुचतेच. शिवाय तोंडावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. मग काय बैलगाडाचा धुराळा आणि तेही श्रीमंत पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार होणारच.
जाधववाडी-टाळगाव चिखली गावात मे महिन्यांच्या अखेरीस देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होणार आहे. या शर्यतीसाठी सुमारे दीड कोटीच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. अंतिम स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकासाठी जेसीबी, बोलेरो अन् ट्रॅक्टरसह इतर बक्षिसांमध्ये टू-व्हीलर, एलईडी चांदीची गदा अन् सोन्यांच्या नाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी काही अटींवर नुकतीच उठविली. शिवाय कोरोनाचे संकट कमी झाल्याने जत्रा - यात्रांवरील निर्बंध उठविण्यात आले.
सध्या गावाच्या इर्षेतून व राजकीय आर्थिक पाठबळाने बक्षिसांची चढाओढ लागली आहे. कोणी चांदीची गदा, तर कोणी पहिले बक्षीस म्हणून बुलेटची घोषणा करीत होते. त्यावर आता जाधववाडी चिखलीच्या ग्रामस्थांनी कहर केला.
आम्ही तीन पिढ्यांपासून शर्यतीचे आयोजन करीत आहे. अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. आता ही बंदी उठविल्यामुळे सर्वजण एकत्र येऊन देशातील सर्वात मोठी शर्यत भरविण्याची कल्पना पुढे आली.
- हनुमंत जाधव, अध्यक्ष, हनुमान बैलगाडा मंडळ, जाधववाडी टाळगाव चिखली