आव्हाळवाडी : आव्हाळवाडी येथील जेसीबीचे ब्रेकर चोरी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा व लोणी कंद पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे.
महादेव अंबादास शेळके (रा. आव्हाळवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसीबीचे ब्रेकर चोरी झाल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. त्यानुसार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून तपास चालू असताना आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील मोरे वाडा येथे आरोपी येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पथक व लोणी कंद गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली असून लोणी कंद पुणे शहर यांचे हद्दीतून अशाच प्रकारचे जेसीबी मशिनचे आणखीन एक ब्रेकर चोरी करून नेल्याची कबुली दिली आहे. त्याचेकडून २७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणी कंद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, उपकांत कुंजीर, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, अक्षय जावळे, लोणी कंद पोलीस स्टेशनचे पोह. बाळासाहेब सकाटे. पो.कॉ. हृषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.