पुणे : आयआयटी मुंबईने नुकतीच जेईई ॲडव्हान्स परीक्षा घेतली. या परीक्षेत अनेक तांत्रिक त्रुटी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फेरपरीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी काही पालक आणि विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी गुरुवारी म्हणजे आज हाेणार आहे.
आयआयटी मुंबईने २८ ऑगस्ट रोजी विविध केंद्रांवर जेईई ॲडव्हान्सची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न झूम इन होणे, परीक्षा सुरू असताना स्क्रीनवर एकही प्रश्न न दिसणे, माऊस व्यवस्थित न चालणे अशा अनेक अडचणी आल्या होत्या. अनेक तांत्रिक दोषांचाही सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. त्या तक्रारी आयआयटीकडे केल्या तरी त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित सोडविता आली नाहीत. परीक्षेवर लक्ष केंद्रीत करता आले नाही. त्यामुळे त्यांची चूक नसतानाही गुणांवर परिणाम हाेऊ शकताे, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. जेईई ॲडव्हान्सची परीक्षा देशभरात एकाचवेळी घेण्यात आली हाेती व तिचा निकाल ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक दोषांअभावी पेपर सोडविता आला नाही, त्यांचे यात नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा तांत्रिक दोषांमुळे त्यांचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या पालकांनी विचारला आहे. त्याची सुनावणी होणार असल्याची माहिती डॉ. गोरख झेंडे या पालकांनी दिली.
दखल न घेतल्याने याचिका
नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. परीक्षा नियंत्रण समितीकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ५ सप्टेंबर रोजी ॲड. प्रांजल खटावकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली आहे.