पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, राज्यातील पाच विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. त्यात गार्गी बक्षी, स्नेहदीप गयेन, अमेय देशमुख, अर्थव तांबट, सौरभ कुलकर्णी यांचा समावेश आहे. देशातील सुमारे २.५ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षेत यश संपादन केले आहे.
एनटीएतर्फे देशातील व देशाबाहेरील ३३४ शहरांमध्ये ९२५ परीक्षा केंद्रांवर जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली. देशातील एकूण ९ लाख ३९ हजार ८ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा दिली. त्यात ६ लाख ५८ हजार ९३९ मुलांनी तर २ लाख ८० हजार ६७ मुलींनी परीक्षा दिली. एनटीएच्या संकेतस्थळावर परीक्षेची उत्तर सूची व सर्वाधिक गुण मिळवून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे यादी जाहीर केली आहे.
मागील वर्षी परीक्षेसाठी सुमारे बारा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या वर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नऊ लाख ३९ हजार एवढी आहे.यंदा परीक्षेस प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे या वर्षी कट ऑफसुद्धा कमी झाला आहे.
पुण्यातील नमन अग्रवाल याने ९९.९९८ पर्सेंटाईल गुण मिळवत देशात ४४ वा व पुण्यात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे. तसेच जैनेश मेहता, शुभ्रनील चटर्जी, रोनित ननवानी, सोहम जोशी, संतोष देशीनेनी, साजल देवळीकर, श्लोक पांडे, अथर्व कुलकर्णी, सोहम निवरंगी यांनी ९९.९९ ते ९९.९६ पर्सेंटाईलच्या दरम्यान गुण मिळवले आहेत.