जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा मर्दानी दसरा उत्सव जेजुरी गड आणि जयाद्रीच्या पर्वत रांगेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल १८ तास हार्दिक उत्सव रमला होता. या उत्सवामध्ये शहरातील अठरा पगड जातीधर्मातील समाजबांधवांनी परंपरेनुसार आपापली सेवा श्रींच्या चरणी रुजू करीत मानपान दिले व घेतले. सालाबादप्रमाणे सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर ऐतिहासिक खंडा स्पर्धेने सोहळ्याची सांगता झाली.
शनिवारी (दि. १२) देवांची पूजा अभिषेक, भूपाळी आरती झाल्यानंतर मुख्य पुजारी, सेवेकरी विश्वस्त मंडळाच्या हस्ते घट उठविण्यात आले. त्यानंतर ध्वजपूजन, शस्त्र, नगारापूजन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता मावळत्या सूर्याच्या साक्षीने, भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण करीत, सदानंदाच्या जयघोषात मानकरी पेशवे, खोमणे पाटील, माळवदकर पाटील यांनी इशारा करताच खंडेरायाच्या पालखी सोहळ्याने सनई चौघड्यांच्या मंगलमय सुरात सीमोल्लंघन, आपटापूजन, देव भेटाभेट सोहळ्यासाठी गडकोटातून प्रस्थान ठेवले. गडकोट प्रदक्षणा करून सोहळा दक्षिण दिशेला माळावर स्थिरावला. रात्री नऊच्या सुमारास खंडेरायाचे मूळस्थान कडेपठार येथील पालखी सोहळ्याचे सीमोलंघनासाठी प्रस्थान झाले.
यावेळी चौका-चौकामध्ये ग्रामस्थांच्या वतीने रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भुईनळे शोभेच्या दारूकामाची आतषबाजी करण्यात येत होती, तर धनगर बांधवांकडून लोकर उधळण करीत, लोकगीते गात सुंबरान मांडण्यात आले होते. पारंपरीक लोक कलावंतांनी पालखीपुढे भक्तिगीते गात आपली सेवा रुजू केली. ‘रोजमुरा’ वाटप झाल्यानंतर उत्सवमूर्ती मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात नेण्यात आल्या आणि खंडा स्पर्धेला सुरुवात झाली. सोनोरीचे सरदार महिपतराव पानसे यांनी १७६१ साली नवसपूर्तीसाठी सुमारे ४२ पौंड वजनाचा पोलादी खंडा (तलवार) खंडेरायाला अर्पण केली होती. गेली ३० वर्षांपासून येथील युवकवर्ग एका हातात खंडा तोलने, तसेच विविध चित्त थरारक कसारतींचा सराव करून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेत उतरतात.