जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत येत्या मंगळवारी (दि. १७) महाशिवरात्री यात्रा असून, यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून, भाविकांनी देवाचे दर्शन घेण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त खंडोबा गडकोटातील मुख्य मंदिराचा कळसातील शिवलिंग, (स्वर्गलोक) मुख्य गाभारा (भूलोक) आणि गाभाऱ्यातील डाव्या कोपऱ्यातील तळघरातील शिवलिंग (पाताळलोक) ही तिन्ही ठिकाणे दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी खुली असतात. असा योग वर्षातून केवळ महाशिवरात्रीलाच येत असल्याने भाविकांची मोठी गर्दी राहणार आहे. भाविकांना देवदर्शन सुलभ व सुरक्षित व्हावे, म्हणून जेजुरी पोलीस ठाण्यात स. पो. नि. रामदास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली देव संस्थानचे विश्वस्त, पुजारी सेवकवर्ग व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीला मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, विश्वस्त संदीप घोणे, अॅड. वसंत नाझिरकर, जेजुरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, नगरसेवक अमोल सातभाई, पुजारी व ग्रामस्थ नितीन बारभाई, रवींद्र बारभाई, दिलीप मोरे, सतीश कदम, रमाकांत मोरे, अनिल मोरे आदी पुजारी, सेवेकरी, देव संस्थान कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र गर्दीचा ओघ पाहता गाभाऱ्यातील तळ्घरातील शिवलिंग मंगळवारी (दि. १७) सकाळी १० ते ६ या काळात केवळ मुख दर्शनासाठीच खुले ठेवण्यात येणार आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीत प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनी जेजुरीत भाविकांची वाढती गर्दी पाहता पूजा अभिषेक विधीसाठी भंडारगृहात नव्या मूर्ती तयार करून तसे नियोजन करण्याचा मानस आहे. (वार्ताहर)
महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी जेजुरीनगरी सज्ज
By admin | Published: February 16, 2015 4:27 AM