जेजुरी: ज्ञानोबा - तुकोबांच्या गजरात अन् भंडाऱ्याच्या उधळणीत माउलींच्या पालखीचे जेजुरीत जोरदार स्वागत झाले. श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा एस टी च्या बस ने पंढरीकडे रवाना झाला आहे. माऊलींच्या पादुका असणारी शिवशाही बस, त्यांना सोहळ्या सोबत असणाऱ्या ४० वारकऱ्यांसमवेत पंढरीकडे निघाला होता. आज जेजुरीतून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पंढरीकडे जात असताना माऊलींचा गजर आणि भांडाऱ्याची मुक्त हस्ताने उधळण करीत जेजुरीकरांनी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी जेजुरीतील मुख्य चौकात तसेच पालखी महामार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
आळंदीतून ''पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय" अशा जयघोषात तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चांदीच्या चलपादुका घेऊन आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास आजोळघरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले . या पार्श्वभूमीवर शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या दोन्ही विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रित चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत. बस अनेक जिल्ह्यातून पंढरपूरला जात आहे. ठिकठिकाणी नागरिकांकडून पुष्पवृष्टी आणि माउलींचा गजर करत पालखीचे स्वागत केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर खंडेरायाच्या जेजुरीत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.
वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी
यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हा सोहळा संपन्न होईल. मानाच्या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी होईल.