जेजुरी (पुणे): तृतीय पंथीय असल्याचे सांगून वेषांतर करीत चोऱ्या करणाऱ्या भामट्याला जेजुरीपोलिसांनी सोलापूर येथून जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे हा भामटा तृतीय पंथी नसल्याचे समोर आले आहे. अभिषेक रावसाहेब भोरे ( वय २७ ) रा. उत्कर्षनगर, विजापूर नाका सोलापूर याला सासवड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लॉकडाउन उठल्याने मंदिरे खुली झाली आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरीत वाघ्या मुरुळीचा व्यवसाय करणारे कलावंत आता सांस्कृतिक कार्यक्रमांना ही परवानगी मिळाल्याने आपला व्यवसाय सुरू करू लागले आहेत. जेजुरीतील एका वाघ्या मुरुळीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला ही आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकलाकाराची गरज होती. तिच्या फेसबुकवर राणी किन्नर म्हणून एक फ्रेंड होती तिने तिला सह कलाकार म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.
फेसबुक फ्रेंड असल्याने तसेच एक दोन वेळा जेजुरीत येऊन या मुरुळीकडे मुक्काम केलेला असल्याने तिने ही कोणतीच शंका न घेता त्याला सहकलाकार म्हणून घेण्याचे निश्चित करून जेजुरीला बोलावून घेतले होते. सदर भामट्याने तृतीय पंथीयच्या वेषात तिच्याकडे दोन दिवस राहिला. जागरण गोंधळ पार्टी सुरू होणार असल्याच्या आनंदात सार काही आलबेल असतानाच या भामट्याने भल्या पहाटे दीड तोळा सोन्याचे मंगळसूत्र, व माळ, सहा हजार रुपये रोख असा साठ हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने जेजुरी पोलिसांकडे चोरीची फिर्याद दिली. आरोपीने महिलेला मात्र आपण सातारा येथील रहिवाशी असल्याचे सांगितले होते.
तपासात सदर आरोपी हा सातारा येथील नसून सोलापूरचा रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठांच्या आदेशानुसार जेजुरी पोलिसांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली फिर्यादी मुरुळीसोबत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत झेंडे, पोलीस हवालदार दशरथ बनसोडे, प्रवीण शेंडे, धर्मराज खांडे यांचे पथक सोलापूर येथे तपासासाठी पाठवले. सोलापूर येथे आरोपी मिळून आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी तृतीय पंथी नसल्याचे ही निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीला सासवड न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर आरोपी हा तृतीय पंथीयच्या वेषात महिलांत सहज वावरत असल्याने त्याच्याकडून अशा प्रकारचे इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले. त्याच बरोबर जेजुरी हे तिर्थक्षेत्राचे ठिकाण असून जेजुरीत अनेक अनोळखी लोक देव दर्शनासाठी जेजुरीत येत असतात. अशा लोकांना घरात अथवा लॉजेस मध्ये प्रवेश देण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेत जावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.