बारामती: जेजुरी आणि रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या या दोन ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे नवीन कनेक्शनचे अर्ज प्राप्त होताच आवश्यक वीज यंत्रणा उभारुन युद्धपातळीवर वीज जोडणी देण्याचे काम महावितरणने दोन दिवसांत केले आहे.
जेजुरी येथील मे. कायचंद्राची दैनंदिन ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२.५ मेट्रीक टन आहे.तर मे. ऑक्सी-एअर रांजणगावची दैनंदिन क्षमता साधारण ०८ मेट्रीक टन इतकी आहे. सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर जास्तीचा ऑक्सिजन पुरवठा युद्धपातळीवर होणेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे दोन्ही प्रकल्प त्वरीत कार्यन्वित होणेसाठी लक्ष ठेवून होते. त्यासाठी त्यांच्या स्तरावरुन सातत्याने पाठपुरावा चालू होता.
कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी युद्ध पातळीवर कामे पूर्ण करुन दोन्हीही कंपन्यांचा वीज पुरवठा ताबडतोब चालू करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व तसेच काम करणाऱ्या ठेकेदाराला दिल्या होत्या. याकामी महावितरणच्या रांजणगाव व जेजुरी येथील अभियंता व वीज कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. त्यामुळे संपूर्ण कामे दोन दिवसांच्या आत पूर्ण करुन आज (दि.२३) वीजपुरवठा चालू करणे शक्य झाल्याचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले.