विशेष म्हणजे या रुग्णालयात ३२ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
३० बेडचे असणारे हे ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक सोयीसुविधांचे रुग्णालय असल्याचे सांगितले जाते. मात्र सुविधांचा अभावच जास्त आढळतो. येथे आज कोविड सेंटर बनवले असल्याने येथे बाह्यरुग्णांवर कोणतेच उपचार होत नाहीत. उपचार करायला येथे वैद्यकीय अधिकारीच नाहीत. संपूर्ण कोविड सेंटर एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या जबाबदारीवर सुरू आहे. त्यातही रुग्णालयात फक्त दोन व्हेंटिलेटर बेड आहेत. त्यातील एक नादुरुस्तच आहे. शिवाय व्हेंटिलेटरतज्ज्ञ नसल्याने तेही बंद आहे. यामुळे केवळ ऑक्सिजन बेडचीच काय ती सुविधा असून अत्यंत गंभीर रुग्ण असेल तर त्याला खासगी हॉस्पिटल एवढाच एकमेव पर्याय आहे. एक्स रे विभाग आहे, यंत्रसामग्री आहे मात्र टेक्निशियन नसल्याने तो विभाग बंदच आहे. वास्तविक रुग्णालयाला एकूण २९ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, मात्र अनेक पदे रिकामी असल्याने पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी महत्त्वाचे विभाग बंद आहेत. शस्त्रक्रिया विभाग आहे, मात्र सुविधा नाहीत. विशेष म्हणजे रुग्णालयाला रुग्णवाहिका ही नसल्याने हे रुग्णालय कशासाठी उभारलेय, हाच प्रश्न नागरिकांकडून नेहमीच उपस्थित केला जात आहे. वैद्यकीय अधीक्षक, सहायक अधीक्षक, एक वैद्यकीय अधिकारी, २ अधिपरिचरिका, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक नेत्रचिकित्सा अधिकारी, दंतशल्य चिकित्सक, एक्सरे टेक्निशियन, एक वर्ग चार कर्मचारी एवढी पदे रिक्त असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर हे रुग्णालय कसेबसे चालू आहे. कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याचबरोबर इथल्या असुविधाही वाढताना दिसत आहेत. यामुळे शासनाने तब्बल २० कोटींहून अधिक रुपये खर्च करून उभारलेले हे रुग्णालय दिसायला अत्यंत देखणे आहे, मात्र रुग्णालय असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच परिस्थिती या रुग्णालयाची आहे. शासनाकडून याबाबत त्वरित उपाययोजना करणे गरजेचे बनलेले आहे.
कोविड सेंटर सुरू केल्यामुळे बाह्य रुग्णांचे हाल होत असले तरी येथून गेल्या ७ एप्रिलपासून तब्बल ४० कोरोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत रुग्णालयाकडून ६१४१ जणांना कोविडचे लसीकरण करण्यात आले आहे.
शासनाने मोठा खर्च करून उभारलेल्या या रुग्णालयाकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. इथे कर्मचारी आणि योग्य त्या सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जेजुरीचे ग्रामीण रुग्णालय