जेजुरी : जेजुरीच्या कुलदैवत खंडेरायाच्या मंदिरातील व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाला मुखपट्टी (मास्क) बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी स्वतःची व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, मंदिर व्यवस्थापनाने केली आहे.
राज्यातील प्रमुख तीर्थस्थाने, मंदिरे व गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून ज्या सूचना व आदेश येतील, त्यांचे तंतोतंत पालन करण्यात येईल. आवश्यक तेथे सॅनिटायझर बूथ निर्माण करण्यात येईल. गडकोट आवारामध्ये सूचनाफलक लावण्यात येतील. भाविकांना सध्या मास्क वापरण्याची सक्ती नसली तरी गडकोट आवारात व गर्दीच्या ठिकाणी तो वापरावा, असे आवाहन करण्यात येणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. प्रशासनाकडून पुढील आदेश, सूचना प्राप्त होतील त्याचे पालन करण्यात येईल. यासाठी देवसंस्थान व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे संगणक विभागप्रमुख संतोष खोमणे यांनी सांगितले.