लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : स्टील आणि इतर उद्योगांकडून वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्याच्या हालचाली उद्योग विभागाने सुरू केल्या आहेत. आवश्यक तांत्रिक बदल करून दररोज किमान ६७ टन ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल.
पुणे जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळून येत आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात दररोज नऊ ते दहा हजार नवे बाधित रुग्ण समोर येत आहेत. तर, पंचवीस हजार रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. त्यासाठी अत्यावश्यक उत्पादने वगळता इतरांना ऑक्सिजन दिला जात नाही. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी वापरला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इतर उद्योगांचा ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी वापरता येऊ शकतो का? या बाबत चाचपणी केली जात आहे.
उद्योग विभागाचे सह संचालक सदाशिव सुरवसे म्हणाले, जेजुरी एमआयडीसीमधील आयएसएमटी कंपनीत त्यांनी उद्योगासाठी लागणार प्रकल्प उभारला आहे. त्याची दैनंदिन क्षमता ६० टन आहे. मात्र येथे गॅस स्वरूपात ऑक्सिजन तयार होतो. वैद्यकीय कारणासाठी द्रव ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यासाठी कोणते तांत्रिक बदल करावे लागतील, त्याचा खर्च किती येईल याबाबत कंपनीतील तांत्रिक अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहे. त्याच बरोबर साताऱ्यातील लोणंद येथील सोना अलॉइजकडे दैनंदिन सात टन क्षमतेचे तीन प्रकल्प आहेत. त्यातील एक प्रकल्पात तांत्रिक बदल करून तो वैद्यकीय कारणासाठी वापरता येईल की नाही, याबाबत बोलणी सुरू आहेत.
——
जेजुरी आणि लोणंद येथील कंपन्यांनी त्यांच्या प्रकल्पासाठीचा ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यात काही तांत्रिक बदल करावे लागतील. तांत्रिक अधिकाऱ्यांशी त्याबाबत बोलणी सुरू आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यावर निर्णय होईल.
- सदाशिव सुरवसे, सह संचालक, उद्योग
---
अलिबागच्या स्टील कंपनीतून दीडशे टन ऑक्सिजन उपलब्ध
अलिबाग येथील जेएस डब्लू स्टील कंपनीला लागणार ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी घेतला जात आहे. दररोज सुमारे दीडशे ते दोनशे टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे.