जेजुरी : सोमवारी तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा पार पडली. सुमारे चार लाखांवर भाविकांनी कुलदैवताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कुदैवत खंडेरायाच्या उत्सवमूर्तीचा पालखी सोहळा दुपारी १ वाजता गडकोटातून बाहेर पडला. मोठ्या उत्साहात गर्दीत पालखी सोहळा गडाच्या पायरीमार्गावरून उतरत असताना भाविकांची मोठी गर्दी होती. गडकोटातून बाहेर पडल्यानंतर गणेश मंदिराकडून बानूबाई मंदिराकडे सोहळा जात असताना अचानक गर्दीचा लोंढा आला. सोहळ्यासमोर सनई चौघाडा वाजवण्याचा मान असणाऱ्या गडाशी समाजातील वादकांवर लोंढा आल्याने चेंगराचेंगरीच्या प्रकार घडला.
या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले. यात निलेश अरुण मोरे ( वय ३० वर्षे ) यांच्या छातीला जोराचा मार बसल्याने बरगड्या फ्रॅचर झाल्या आहेत. विशाल मोरे चेंगराचेंगरीत खाली पडल्यामुळे यांच्या कपाळाला व डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूला ही मार लागला आहे.घटनास्थळीच तो बेशुद्ध पडला होता. उपस्थितांनी त्याला उचलून गर्दी बाहेर आणले. माऊली मल्हार मोरे ( वय २५ वर्षे ) यांच्या खांद्याला जबर मार लागल्याने खांद्यातून हात निखळला. तर मयांक सचिन कदम ( वय १३ वर्षे ) याच्या हाताचे हाड मोडले आहे. हे या सर्वांना जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमींवर उपचारासाठी यंत्रसामुग्री नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या वेळी देवाची पालखी खांद्यावर पेलून धरणाऱ्या खांदेकरी मानकाऱ्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून थोडावेळ पालखी थांबून सावरली. अन्यथा मोठी गंभीर घटना घडली असती.
दरम्यान, आज मार्तंड देव संस्थान चे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे आणि विश्वस्त अड् पांडुरंग थोरवे यांनी येथील खासगी हॉस्पिटल मध्ये जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. जखमींना आधार देताना देव संस्थान च्यावतीने संपूर्ण वैद्यकीय खर्च करणार असल्याचे सांगितले. जेजुरी सोमवती अमावस्या यात्रेला राज्यभरातून लाखो भाविक दर्शनाला येत असतात. या यात्रेत ही मोठी गर्दी होती. अशा प्रकारची घटना यापूर्वी घडली नव्हती. पहिल्यांदाच ही घटना घडली असून या घटनेची क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे. यात्रेचे संपूर्ण नियोजनच ढासळल्याने ही घटना घडल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.