जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीचा नुकताच प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या समोर मांडून त्यावर हरकती व सूचना घेण्यात आल्या होत्या. आराखड्याबाबत एकूण २८० हरकती व सूचना आल्या होत्या. त्यांची सुनावणी गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस जेजुरी नगरपालिका सभागृहात झाली. नागरिकांचे समाधान करण्यात पालिकेला यश आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले, तरीही शहरातील विरोधी नगरसेवक गणेश निकुडे, हेमंत सोनवणे, माजी नगरसेवक महेश दरेकर, तसेच हृषीकेश दरेकर, गणेश टाक, प्रशांत नाझिरकर, हरिभाऊ रत्नपारखी, सचिन पेशवे, राजू चौधरी, चंद्रकांत दरेकर, महेश सोनवणे आदी ग्रामस्थांनी हा विकास आराखडा पूर्णत: संदर्भहीन, चुकीचा व विसंगत असल्याचा लेखी आरोप करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी सुनावणी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रारूप आराखड्यात मुळातच हे तीर्थक्षेत्र असल्याचा पालिका प्रशासनाला विसर पडलेला दिसत आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण, येथील ऐतिहासिक मंदिरे व वास्तूंचा उल्लेखही आराखड्यात नाही. येथील ग्रामदेवता जानूबाई मंदिर, बल्लाळेश्वर, लवथळेश्वर, मल्हारतीर्थ, जननीतीर्थ, लवतीर्थ, ऐतिहासिक गौतमेश्वर छत्रीमंदिर, होळकर वाडा, होळकर तलाव, पेशवे तलाव आणि ऐतिहासिक चिंचबाग आदींच्या जतन व संरक्षणाबाबत कोणतीच ठोस उपाययोजना आराखड्यात नाही. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६च्या कलम २२ (ह)नुसार या बाबींच्या संरक्षण-जतनाबाबत स्पष्ट निर्देश असूनही तशी तरतूद नाही. शहराची सध्याची लोकसंख्या आणि भविष्यातील वाढणारी लोकसंख्या यांचा मेळ घालणे प्रशासनाला जमलेले नाही. त्याचबरोबर, तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षाकाठी येणाऱ्या भाविकांचा विचार करण्यात आलेला नाही. यामुळे शहराच्या पाणीपुरवठा नियोजनातील प्रस्ताव विसंगत आहे. यात जेजुरी शहरातील बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रांचा आढावा चुकीचा दर्शविला आहे. शहरातील आरोग्याच्या नियोजनाचा आराखडा बनवताना येथे ग्रामीण रुग्णालय असूनही ते न दर्शविता प्राथमिक आरोग्य केंद्राचा उल्लेख केला आहे. परिशिष्टात तर फक्त ६ दवाखाने दर्शवले आहेत. शहरात ड्रेनेज सिस्टीम असल्याचा उल्लेख असूनही तसे दर्शविण्यात आलेले नाही. १४ गंभीर चुका असूनही शासनाकडे पाठविण्याचा प्रशासनाचा घाट आहे. तो जेजुरी शहराच्या भविष्यातील नियोजनाला कोणत्याही पातळीवर योग्य ठरत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत सुनावणी अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्देश पालिका प्रशासनाला द्यावेत आणि नव्याने आराखडा तयार करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
जेजुरीचा प्रस्तावित विकास आराखडा चुकीचा
By admin | Published: July 15, 2016 12:33 AM