जेजुरी : येत्या दि. ६ रोजी सोमवारी आलेली सोमवती यात्रा उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती जेजुरीच्या मार्तंड देव संस्थान आणि जेजुरी पोलीस ठाण्याकडून माहिती देण्यात आली आहे. उत्सव रद्द असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नसल्याचे ही यावेळी सांगण्यात आले आहे .
येत्या सोमवारी दि. ६ रोजी सोमवती यात्रा येत असून यात्रेनिमित्त जेजुरीत लाखो भाविक देव दर्शनासाठी येत असतात. सकाळी साडेसात वाजल्यापासून सोमवती अमावास्येला प्रारंभ होत असल्याने दिवसभर अमावस्या राहणार असल्याने या वेळी मोठी गर्दी राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज जेजुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे व विश्वस्त मंडळ, देवाचे मानकरी, पुजारी, खांदेकरी, ग्रामस्थ मंडळी यांच्यात बैठक घेण्यात आली होती. बैठकीत कोरोनाच्या वाढता प्रसार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने सोमवती यात्रा उत्सवच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर मार्तंड देव संस्थानने सोमवती यात्रा उत्सव रद्द केलेला असून मंदिर ही देवदर्शनासाठी बंदच राहणार आहे. भाविकांनी जेजुरीत येऊ नये, गर्दी करू नये असे लेखी निवेदनाद्वारे आवाहन केले आहे.
गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी ही या रविवार व सोमवारी कोणत्याही प्रकारचे बाहेर गावातील व्यक्तींचे बुकिंग घेऊ नये. सोमवती यात्रेनिमित्त निघणारा पालखी उत्सव ही रद्द केलेला आहे. दर्शनासाठी मंदिरात ही कोणाला ही प्रवेश दिला जाणार नाही, असे आवाहन करण्यात आलेले आहे.