धनकवडी (पुणे) : गडद रात्रीच्या अंधारात, तोंडाला कपडा गुंडाळून मंदीराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत देवीला सांष्टांग दंडवत घालून मंदीरातील देवीच्या दागिन्याची चोरी करुन साथीदारासह पसार झाला होता. त्या आरोपीला नवरात्री उत्सवात ताब्यात घेण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले. सुनिल आण्णा कांबळे, (वय ३६ वर्षे, धंदा मंडप बांधणे, रा. रामनगर, बापुजी बुवा चौक, वारजे) असे मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपी चे नाव आहे.
आरोपीवर तब्बल ५० पेक्षा अधिक घरफोडी व चोरीचे तसेच डबल खूनाचे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये सन २०१८ पासून जेलमध्ये होता. आता तो मार्च २०२३ मध्ये जामीनावर बाहेर आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत भिलारवाडी कात्रज घाटा तील वळणाजवळ चामुंडाभवानी माता मंदीर असून मंदीरामध्ये (दि. २२ आँगस्ट ) २,६०,०००/- रु किमंतीच्या देवीच्या दागिन्याची चोरी झाले होती.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये रोशन ऋषीराज दाहाल (वय-३३ वर्षे, धंदा-पुजारी रा चामुंडा भवानीमाता मंदिराचे मागे, राज टावर, सी-विंग, भिलारेवाडी, कात्रज) यांनी दिलेल्या फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपास करत असताना भारती विद्यापीठ शोध पथकाने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, आरोपी घटनेच्य दिवशी, तोंडाला कपडा गुंडाळून मंदीराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत देवीला सांष्टांग दंडवत घालून मंदीरातील देवीच्या दागिन्याची चोरी करुन साथीदारासह पसार झाला होता.
दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन शोध पथकातील महेश बारावकर, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांनी आरोपीच्या मंदीरातील हालचाली व सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषनाच्या मदतीने आरोपी सुनिल कांबळे, यास अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.