पुणे : सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने ३ लाख २९ हजारांचे दागिने चोरणाऱ्या एकास फरासखाना पोलिसांनी अटक केली.
विनय प्रकाश पावटेकर (वय ३९, रा. शनिवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिकाची रविवार पेठेतील सोन्या मारुती चौक परिसरात सराफी पेढी आहे. पावटेकर चार दिवसांपूर्वी सराफी पेढीत दागिने खरेदीच्या बहाण्याने आला. सराफी पेढीतील कर्मचाऱ्याच्या नकळत सोन्याची दोन मंगळसूत्रे लांबविली. पावटेकर दागिने लांबवून पसार झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे पावटेकरचा माग काढून त्याला पकडण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग तपास करत आहेत.
----