लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करून त्यांचे दागिने नकळत लंपास करणाऱ्या टोळक्यापैकी दुक्कलीस गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. विविध १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १० गुन्हे उघडकीस आले असून बांगड्या, पाटल्या, सोनसाखळी असे १९१ ग्रॅम वजनाचे ५ लाख ५३ हजार किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली.जयकुमार विजय धुमाळ उर्फ सोन्या (वय २८, पवारवस्ती, केशवनगर, मुंढवा, मूळ गाव लोणंद, ता. फलटण, सातारा) आणि संतोष अमृत जाधव (वय २९, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, मूळ गाव तडवळ, अक्ककोट, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना मदत करणाऱ्या ५ साथीदारांचा शोध सुरू आहे.याविषयी अधिक माहिती देताना डहाणे यांनी सांगितले की, पुणे स्टेशन, स्वारगेट आणि शिवाजीनगर बस स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी बसने प्रवास करणाऱ्यांचे दागिने, मोबाईल, रोकड अशा चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आरोपी सकाळी किंवा सायंकाळी गर्दीच्या वेळी एकत्र जमत. दागिने असलेल्या ज्येष्ठ महिलांना घेराव केला जाई. साईनाथ लिंगाप्पा जाधव हा त्यांचा साथीदार कटरने बांगडी किंवा सोनसाखळी सफाईदारपणे दागिना चोरून बसमधून उतरुन जात असे. अन्य साथीदार पुढच्या स्टॉपवर उतरत.अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सीताराम मोरे, रवींद्र बाबर, प्रकाश अवघडे, गुनशिलन रंगम, अशोक भोसले, स्टिवन सुंदरम, रोहिदास लवांडे, अनिल घाडगे, गजानन गनबोटे, राजू रासगे, बशीर सय्यद, अतुल साठे, संदीप राठोड, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे, चालक सुजित पवार यांनी या कारवाईत भाग घेतला.
दागिने चोरणारी दुक्कल गजाआड
By admin | Published: May 25, 2017 2:47 AM