ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 25 - भांगरवाडी येथील एका बंद सदनिकेतून भरदिवसा चोरट्यांनी तब्बल 20 तोळं सोनं चोरुन पोबारा केला आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री 10 वाजता लोणावळा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुनिता पवार यांनी घरफोडी झाल्याची फिर्याद दिली आहे. पवार यांनी त्यांच्या नातेवाईकांचे लग्न असल्याने बँकेंच्या लॉकरमधून सोन्याची दोन मंगळसूत्रं, सोन्याच्या बांगड्या, लहान मुलांची सोन्याची चेन, कानातील झुमके, 3 अंगठ्या, कानातले, वेढण्या, सोन्याचा नेकलेस, ब्रेसलेट, चांदीचे तीन तोळ्याचे ब्रेसलेट, असे 7 लाख 66 हजार 200 रुपयांचे दागिने घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले होते.
सोमवारी सकाळी पवार दाम्पत्य नेहमीप्रमाणे कामाला गेले व मुलगा सोहम हा शिकवणीला गेला होता. घर बंद असल्याचा डाव सांगत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी सकाळी 11:15 ते सायंकाळी 5:15 दरम्यान घराच्या लोखंडी दरवाज्याचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुमधील लोखंडी कपाटामधील लॉकरमधून वरील दागिने पळवले. सोहम व सुनिता या सायंकाळी 5:30 वाजता घरी आल्यानंतर सदर चोरीची घटना उघड झाली.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.