इंदापूर : मुलगी पाहण्यास आलेले पाहुणे ‘शुभमंगल’ उरकूनच गेले. तासाभरात नवरी सासरी गेली. सुरवड (ता. इंदापूर) येथे ही ‘झट मंगनी पट शादी’ झाली. त्याचे झाले असे, रविवारी तालुक्यातील हिंगणगावचे रहिवासी संजय तुकाराम हजारे यांचा मुलगा दीपक याच्यासाठी मुलगी पाहण्याकरिता हजारे हे कोळी महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हजारे, सुनील माने यांच्यासमवेत सुरवड (ता. इंदापूर) येथे ज्ञानदेव कोळी यांच्याकडे गेले होते. कोळी यांची मुलगी रूपाली ही हजारे यांना पसंत पडली.या वेळी सुरवडचे रहिवासी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुरेश मेहेरही तेथे आले होते. मुलाला मुलगी पसंत आहे, कसल्या जाचक अटी नाहीत, हे पाहिल्यानंतर नंतर दोन्ही कुटुंबांना लग्नासाठी जादा खर्चात पाडण्यापेक्षा या घडीलाच लग्न उरकून घेतले तर काय हरकत आहे, अशी सूचना राजेंद्र हजारे यांनी मांडली. ती सर्वांनाच मान्य झाली. उपस्थित असणाऱ्या लोकांच्या साक्षीने एका तासात विवाह सोहळा पार पडला. (वार्ताहर)
‘झट मंगनी पट शादी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 1:42 AM