पुणे : गाय वाचविणे हा देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न समजून त्यासाठी माणसे मारणाºयांनी आणि त्यांना पाठीशी घालणाºया सरकारांनी आपल्या या मातेला जरूर आपल्याजवळ ठेवावे. परंतु तत्पूर्वी दलित, अल्पसंख्य, महिला, गरिबांचे मूलभूत प्रश्न सोडवावेत, असे आवाहन आझादी कूच आंदोलनाचे नेते जिग्नेश मेवाणी यांनी मंगळवारी केले.हिंदी है, हिंदोस्तां हमारा परिषदेच्या वतीने रविवारी पुण्यात हिंसाचारविरोधी अमन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये अनोख्या पद्धतीने परिषदेचे उद्घाटन झाले. ‘सर्व त्या संविधानिक मार्गाने हिंसाचार रोखा,’ असे देशाच्या राष्ट्रपतींना आवाहन करणारे पत्र मेवाणी यांनी पोस्टपेटीच्या प्रतिकृतीत टाकले आणि परिषदेचे उद्घाटन झाले. या वेळी महिला नेत्या डॉ. मनीषा गुप्ते, हिंदोस्तां हमारा परिषदेचे नेते हुमायून मुरसल, निवृत्त कर्नल सुरेश पाटील, संयोजक नितीन पवार मंचावर उपस्थित होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी हाजी नदाफ होते.गेल्या वर्षी जुलैमध्येच उना, गुजरात येथे मेलेली जनावरे ओढण्याचे काम करणाºया चार दलित तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली. गाय मारल्याच्या संशयावरून या तरुणांना अर्धनग्न करून वाहनाला बांधून लोखंडी रॉड, पट्टे, काठ्यांनी कथित गोरक्षकांनी मारले. त्याविरुद्ध मेवाणी यांनी उभे केलेले प्रचंड आंदोलन देशभर गाजले. त्याचा संदर्भ देऊन मेवाणी म्हणाले, ‘‘उना आंदोलन हे स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून उभे राहिले. तरी गेले वर्षभर त्याच्या मूलभूत कारणांचा आम्ही शोध घेत होतो. त्या वेळी दलितांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या ताब्यात नसल्याचे पुढे आले. म्हणून उना घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आम्ही जमिनीची मागणी करत आझादी कूच आंदोलन केले. परिणामी दलितांची हिसकावलेली हजारो एकर जमीन त्यांना परत मिळाली. आता जनावरे ओढण्याची आवश्यकता राहणार नाही. ते काम गोमातेच्या लेकरांनी करावे. पाणी, शिक्षण, रोजगार, वीज अशा मूलभूत प्रश्नांवर दलित, मुस्लिमांनी लढे उभे करावेत. कथित धर्मरक्षकांच्या हिंसेला हेच उत्तर आहे. त्यासाठी दलित मुस्लिमांनी एकजूट केली पाहिजे. जातीअंत हेच अंतिम उद्दिष्ट ठेवायला हवे.’’ मनीषा गुप्ते, हाजी मरसूल यांनी विचार व्यक्त केले. नितीन पवार यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सादिक लुकडे यांनी आभार मानले.
गाय तुमच्याकडे ठेवा, आमचे मूलभूत प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 7:33 AM