पुणे : ज्या भूमीत साहित्य संमेलन होत आहे तिचे वैशिष्ट्य सांगणाऱ्या अनेक गोष्टी विविध माध्यमांमधून समोर आणल्या जातात. यंदा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा नगरीत ९१व्या साहित्य संमेलनाद्वारे ‘मराठी’ अस्मितेचा जागर होणार आहे. त्यानिमित्ताने बडोद्याचे गुणगाण करणारे ‘धन्य आमुची सयाजीनगरी, धन्य आमुची बडोदे नगरी’ याचे बोल सर्वत्र घुमणार आहेत. एका युवा गायकाच्या ‘मिझोना बँंड’ने हे जिंगल गीत तयार केले असून, गुजराथीसह मराठी बांधवांनी ‘कॉलर आणि रिंगटोन’ म्हणून या गीताचा वापर करावा यासाठी हे गीत संमेलनाच्या फेसबुक पेजवर टाकण्यात आले आहे. कुणालाही हे गीत सहजपणे डाऊनलोड करता येणे शक्य आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने महिनाभर तरी आपल्या मोबाईलवर कॉलर किंवा रिंगटोन म्हणून हे गीत ठेवावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. जी मजा रॉक शो किंवा इतर तत्सम गोष्टीतून मिळते तसे साहित्य संमेलनात काही नसते असा एक समज असलेल्या युवापिढीला बडोद्याच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडे वळविण्यासाठी आयोजकांनी ‘तरूणाई’ला लक्ष्य केले आहे. साहित्य संमेलनाची प्रसिध्दी करण्यासाठी जिंगल गीताबरोबरच यूट्यूबसह इन्स्टाग्रामचाही उपयोग करण्यात येत आहे. या जिंगल गीताचे लेखन चंद्रशेखर अग्निहोत्री यांनी केले असून, स्वरित केळकर याच्या ‘मिझोना बँड’ या गीताला संगीतबद्ध केले आहे. परंतु केवळ गीत म्हणूनच याचा वापर मर्यादित ठेवण्यात येणार नसून, कॉलर ट्यून आणि रिंगटोन म्हणून देखील ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मंगेश खोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
युवापिढीसाठी संमेलनात काय आहे हे सांगणारा ‘व्हिडिओ’साहित्य संंमेलन फक्त ज्येष्ठांसाठी असते अशी काहीशी धारणा युवापिढीमध्ये निर्माण झाल्याने त्यांच्याकडून संमेलनाला पाठ फिरविली जाते. त्यामुळे या संमेलनामध्ये आपल्यासाठी नक्की काय आहे, तरूणाईची साहित्यिक भूक कशी भागली जाऊ शकते. त्यात आपण काय करायचंय? असा प्रश्न पडाणाऱ्या तरूणाईसाठी एक व्हिडिओ निर्मित करण्यात आला आहे. या व्हिडिओला जगभरातील युवापिढीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतसाहित्य संमेलनाला जाण्याची खूप इच्छा आहे. जाण्या-येण्याचा खर्च करू शकतो. पण राहायचे काय? तो खर्च परवडणे शक्य नसल्याने संमेलनाला येऊ शकत नसलेल्या तरूणाईसाठी आयोजकांनी विशेष सवलत जाहीर केली आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवासाची आणि राहण्याची सोय आयोजकांकडून विनामूल्य केली जाणार आहे. मात्र यासाठी महाविद्यालयाचे सहमती पत्रक आणणे आवश्यक आहे, असे खोपकर यांनी स्पष्ट केले.