पुणे : सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणातील आरोपी बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी याचा जामीन रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.कर्नाटकी याला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, तर प्रकरणात माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर (रा. कमलसुधा अपार्टमेंट, नारायण पेठ), विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०, रा़ कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़ शांतीनगर, येरवडा), नाना कुदळे (रा़ केळेवाडी) व अजय कंधारे यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.सध्या पोलीस या प्रकरणात तपास करीत असून त्यांच्यावर दोषारोपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. तपास अधिकारी ज्यावेळी बोलावतील त्यावेळी हजर राहून तपासास सहकार्य करायचे, या अटीवर कर्नाटकी याला ३० हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणातील इतर आरोपींना मोक्का लावला आहे. त्यामुळे कर्नाटकी याचा जामीन रद्द करून त्यावरदेखील मोक्कांतर्गत कारवाईची मागणी करणारी याचिका जगताप यांचा मुलगा जयेश जगताप (वय २८, रा़ घोरपडे पेठ) यांनी नुकतीच दाखल केली आहे.
जितेंद्र जगताप आत्महत्या : कर्नाटकीचा जामीन रद्दबाबत याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 2:37 AM