पुणे :गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुमासदार जुगलबंदी पुण्यात बघायला मिळाली. 'दादा', निदान अकराला तरी कार्यक्रम ठेवत जा' या आव्हाड यांच्या वाक्यावर 'जितेंद्र, तूही लवकर कामाला लागायची सवय कर' असं प्रत्युत्तर पवार यांनी दिले.
पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्राच्या कार्यालयाचे उदघाटनाच्या कार्यक्रमात ही जुगलबंदी बघायला मिळाली. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या महापौर उषा ढोरे आदी उपस्थित होते.
आव्हाड यांनी भाषण करताना, 'रात्री ११पर्यंत मिटिंग सुरु असतात, तरी सकाळी ७ वाजता ठाण्यातून निघून १० वाजता पोचलो असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या इतका आमचा उरक नसला तरी आम्ही त्यांच्यामागे धावतोय असे म्हटले. पुढचे कार्यक्रम निदान ११ वाजता तरी ठेवा. तुम्हाल 5 तास झोप चालते मात्र आम्हाला 6 - 7 तास तरी लागते अशी विनंती केली.
त्यावर पवार यांनीही फटकेबाजी करण्याची संधी सोडली नाही. उत्तर देताना पवार म्हणाले की, 'मी मागच्या आठवड्यात नाशिकला थंडीत सकाळी सात वाजता कार्यक्रम घेतला, त्यावेळी यापेक्षा २५ पट लोक होते. आपल्याकडे सूर्यमुखी असणाऱ्यांनी लवकर उठलं की काम सगळी होतात. मुख्यमंत्री असताना शरद पवार रात्री २ वाजता झोपायचे तरी सकाळी ७ वाजता उठून कामाला सुरुवात करायचे. 'जितेंद्र', तशी सवय तू पण लावून घेतली तर खूप बरं होईल. मात्र त्यासाठी ७ वाजता निघायचं नाही, तर पहाटे ४ला निघायचं आणि सकाळी ७ला कामाला लागायचं अशी कोपऱखळीही त्यांनी मारली.