पुणे : मान कापूनही जिवंत राहिलेला तरुण, अनेकदा रिकामी केली तरी घागरीत पुन्हा येणारं पाणी, पोकळ पाईपमधून निघणाऱ्या विविध वस्तू, अशा विविध प्रकारच्या जादू पाहताना प्रेक्षक भारावून गेले होते. क्षणार्धात होणारी जादू पाहताना प्रेक्षकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. निमित्त होते प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या दोन हजाराव्या प्रयोगाचे. तीन पिढ्यांपासून प्रेक्षकांच्या मनावर रघुवीर कुटुंबीयांनी जादूची मोहीणी घातली आहे. या तीन पिढ्यांनी गेल्या ७८ वर्षांमध्ये विविध २७ देशांमध्ये १५ हजाराहून अधिक प्रयोग केले आहेत. याच कुटुंबातील तिसऱ्या पिढीतल्या जादुगार जितेंद्र रघुवीर यांनी त्यांच्या जादुंचे तब्बल दोन हजार प्रयोग रविवारी पूर्ण केले. त्यांचा दोन हजारावा प्रयोग पाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गच्च भरले होते. लहान मुले, तरुण मंडळी तसेच ज्येष्ठ नागरिकही आवर्जुन उपस्थित होते. त्याचबरोबर गायिका बेला शेंडे, सावणी शेंडे, व्यंगचित्रकार चारुहास पंडीत, यांनी या प्रयाेगाला हजेरी लावून रघुविरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काेथरुड नाट्यपरिषदेचे सुनिल महाजन यांच्यावतीने जादुगार जितेंद्र रघुवीर व त्यांचे वडील जादुगार विजय रघुवीर यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून जितेंद्र रघुवीर हे भारतात तसेच परदेशात आपल्या जादुचे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या जादुच्या प्रयोगांनी प्रेक्षकांच्या मनावर एकप्रकारे गारुड केले आहे. त्यांच्या या जादुच्या मोहिनीमुळेच पुणेकरांनी त्यांच्या दोन हजाराव्या प्रयोगाला मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. छोट छोट्या प्रयोगांनी त्यांनी प्रेक्षकांना भारावून सोडले. जितेंद्र रघुवीर यांनी आपल्या जादुच्या प्रयोगांमध्ये प्रेक्षकांनाही सामावून घेतले. त्यांच्या सोबतही काही प्रयोग करुन दाखविण्यात आले. सुरुवातीला रघुवीर यांनी एका रिकाम्या पाईपमधून विविध गोष्टी काढून दाखवत प्रेक्षकांना आश्चर्य चकित केले. काही प्रेक्षकांना मंचावर बोलावून त्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्यांनी दिलेली उत्तरे फळ्यावर लिहिण्यात आली. आणि क्षणार्धात त्यांनी दिलेली उत्तरं लिहिलेली चिठ्ठी त्यांनी एका कुलुपबंद बॉक्समधून काढून दाखवली. या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. त्याचबरोबर धारदार वस्तू वरुन सोडल्यानंतरही न कापली जाणारी मान. हात कापून तो पुन्हा जोडण्याची जादू, रिकाम्या बॉक्समधून बाहेर निघालेला माणूस, केवळ कापडाला धरुन हवेत उडवलेले टेबल हे सर्व जादूचे प्रयोग पाहताना प्रेक्षक थक्क झाले होते. डोळ्याला पट्टी बांधून प्रेक्षागृहात चालविण्यात आलेल्या मोटरसायकलचा प्रयोग पाहताना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याचबराेबर काही क्षणात गायब केलेला माणूस, तीन पत्यांमधून काढलेले अनेक पत्ते असे विविध प्रयाेग सादर करुन त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबराेबर रघुवीर यांनी काही प्रयाेग प्रेक्षकांना शिकवले सुद्धा. रघुवीर यांचा दाेन हजारावा प्रयाेगही प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय असाच हाेता.