पुणे : जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयात (जेएनयु) झालेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव खराब हाेत असल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. या घटनांमुळे देशाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण हाेत असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. पुण्यात पीएमआरडीए कार्यलयात त्या आल्या हाेत्या त्यावेळी त्या बाेलत हाेत्या.
सुळे म्हणाल्या, दिल्लीची सुरक्षा गृहमंत्रालयाच्या ताब्यात आहे. त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे. दिल्लीत सातत्याने अशा घटना होत आहेत. अशा घटना कोणी घडवून आणत आहे की हा योगायोग आहे हे पहावे लागेल. कोणत्याही शिक्षण संस्थेसाठी अशा घटना धोकादायक आहेत. यामुळे देशाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. केंद्र सरकार सातत्याने जेएनयुला टार्गेट करत आहे. जेएनयुतील लिबरल थिंकिंगचा देशाला सार्थ अभिमान आहे. अनेक चांगली लोकं तिथून शिकून बाहेर पडली आहेत. अशा संस्थेला टार्गेट करणे हा दुर्दैवी प्रकार आहे. वेगवेगळ्या कारणाने देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत हे देशाच्या ऐक्यासाठी आणि प्रगतीसाठी घातक असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.