पुणे : पूर्वीच्या सरकारने राजकारणात महिलांना स्थान दिले. परंतु, शैक्षणिक क्षेत्रात महिलांना कुलगुरू केले नाही. मला संघाने कुलगुरू म्हणून जेएनयुमध्ये पाठविले, राज्याने नाही. मी मराठी आहे, असे अनेकजण मानत होते. मात्र, काही ठराविक वर्गाने मी बाहेरून आल्याने माझ्याविरुद्ध राजकारण केले, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) नवनियुक्त महिला कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या, आंतरराष्ट्रीय संबंध व परराष्ट्र धोरण विषयातील तज्ज्ञ डॉ. शांतीश्री पंडित यांची नुकतीच नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबददल त्यांचा सत्कार केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी नामवंत विधिज्ञ व शिक्षण प्रसारक मंडळी, पुणेचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, एकता मासिक फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र घाटपांडे, एकताचे संपादक मनोहर कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. पंडित यांचा हा पुण्यातील पहिलाच जाहीर सत्कार होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, विश्वगुरू होण्याची सर्वांत मोठी संधी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाला आहे. कारण भारतातील हे पहिल्या क्रमांकाचे विश्वविद्यालय आहे. भारतातील विविधता या विद्यापीठात दिसून येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या विद्यापीठाला पहिल्या शंभर क्रमांकात स्थान आहे. या विद्यापीठाने भारताला अनेक मंत्री दिले आहेत. भारतातील 60 टक्के प्रशासकीय अधिकारी या विद्यापीठातून आले आहेत. या सरकारमध्ये स्वप्न सत्यात उतरविण्याची क्षमता आहे.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, भारताला भाषांची मोठी विरासत लाभली आहे. परंतु दुर्दैवाने हे आपण विसरायला लागलो आहोत. जशी आपण आपल्या मालमत्तेची काळजी घेतो तशीच आपल्या भाषेची काळजी घेतली पाहिजे. भाषा ही सामूहिक विद्वता आणि जाणिवांचे स्वरूप आहे.
ॲड. जैन म्हणाले, तत्त्वाशी तडजोड न करताही तुम्ही मोठे होऊ शकता याचे डॉ. शांतीश्री पंडित या उत्तम उदाहरण आहेत. कुटुंब, गाव, शहर, राष्ट्र याचा विचार करणारे शिक्षण पुढील पिढीला देणे गरजेचे आहे. अमोल दामले यांनी प्रास्ताविक केले. रुपाली भुसारी यांनी सूत्रसंचालन तर मनोहर कुलकर्णी यांनी आभार मानले.