पुणे : खासगी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या कारणांनी ४ जणांना खात्यामध्ये आॅनलाईन पैसे भरायला लावून नोकरीचे बनावट पत्र देऊन ८० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी आदित्य शिंदे (वय २१, रा़ दांडेकर पूल) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून, एका मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांना जून २०१६मध्ये मोबाईलवर एका व्यक्तीने फोन केला. एस. जे. ओव्हरसीज या कंपनीकडून त्यांना नामांकित खासगी बँकेत नोकरी मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना व विशाल घोडके, नयना परदेशी, काजल धुमाळ यांना रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन फी, सिक्युरिटी डिपॉझीट व खाते उघडण्याकरिता डिपॉझीट म्हणून खात्यात रक्कम जमा करण्यास सांगतले. शिंदे यांच्याकडून ३६ हजार व इतर तिघांकडून ४२ हजार ७५० रुपये खात्यात भरायला लावले. त्यानंतर त्यांना निवड झाल्याचे सांगून बँकेचे लोगो असलेले बनावट पत्र कंपनीच्या मेलवरून पाठविले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
नोकरीच्या आमिषाने ८० हजारांचा गंडा
By admin | Published: January 25, 2017 2:20 AM