पुणे : ऑनलाइन चॅटिंग नंतर दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे नोकरीसाठी ऑफर देऊन तरुणीकडून ७ लाख ३ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सायबर चोरट्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तरुणी ही विमान नगर येथे पेईंग गेस्ट म्हणून वास्तव्यास आहे. तसेच कोथरुड येथील नामांकित महाविद्यालयात सिनिअर ॲडमिशन कौन्सिलर म्हणून नोकरीस आहे. ती १५ मार्च २०२३ पासून डीन स्पायडर या सेलिब्रिटीला फॉलो करत होती. त्यानंतर समोरील व्यक्तीकडून तिला हाय हॅलोचे मेसेज सुरू झाले. त्याने मेसेज करून आपण डीन स्पायडर असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने तिला ई-मेल आयडी मागितला.
सोशल मीडियावरील चॅटद्वारे त्याने तरुणीला जॉब ऑफर केली. त्यानंतर त्यांचे बरेच दिवस चॅटिंग सुरू होते. त्यानंतर त्याने तिला वाईल्ड लाईफ सेन्च्युरीसाठी १०० डॉलर डोनेशन मागितले. तिने ऑनलाइन पैसे देखील पाठवले. त्यानंतर त्याने तिला केपटाऊन येथे जॉबची ऑफर आणि लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर पासपोर्ट, विजा, एअर तिकीट व तेथील खर्चासाठी, कुरिअर चार्जेस व डोनेशन धरून तिने ७ लाख रुपये पाठवले. त्यानंतर तरुणीने समोरील व्यक्तीला डॉक्युमेंटबाबत विचारणा केली. त्यावेळी त्या व्यक्तीने उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यावर तरुणीने त्याला पैसे परत कर असे सांगितले असता समोरील व्यक्तीने तिला सर्व पैसे डॉक्युमेंटवर खर्च झाल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीला संशय आल्याने त्याला डॉक्युमेंटचे फोटो पाठवण्यास सांगितले असता, सगळे फोटो खोटे असल्याचे आढळले. दरम्यान, समोरील व्यक्ती आणखी मोठी फसवणूक करणार असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने त्याला आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणीने सायबर पोर्टलवर फसवणुकीबाबत तक्रार केली.